मास्को– कोविड-१९ या विषाणुने जगात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस निर्मितीसाठी जगभर संशोधन सुरु आहे. कधी एकदा लस येते याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील पहिली कोरोना प्रतीबंधक लस लवकरच येण्याची चिन्हे आहेत. कोरोना प्रतीबंधक लसीच्या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचा दावा रशियातील सेशेनोव्ह विद्यापीठाने केला आहे.
सेशेनोव्ह विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलॅशनल मेडिसीन आणि बायोटेक्नॉलॉजी (Institute for Translational Medicine and Biotechnology) चे संचालक वादिम तारासोव्ह यांनी ही माहिती रशियातील अधिकृत वृत्तसंस्था स्पुटनिकला दिली आहे. या लसीच्या मानवी चाचणीसाठी नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांच्या पहिल्या तुकडीला बुधवारी हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं तर दुसऱ्या तुकडीला येत्या २० जुलैला म्हणजे पुढील सोमवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
सेशेनोव्ह विद्यापीठात १८ जूनपासून या मानवी चाचण्यांना सुरुवात केली आहे. गामालेई संसर्गजन्य रोग आणि सूक्ष्मजीवशास्त्र संशोधन संस्थेने ही लस बनवली आहे. कोरोना व्हायरस लसीच्या मानवी चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करणारं सेशेनोव्ह विद्यापीठ हे जगातलं पहिलं विद्यापीठ असल्याने रशियाने तयार केलेली लस ही पहिली असल्याचा दावाही वादिम तारासोव्ह यांनी केला आहे.
या विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटॉलॉजी आणि ट्रॉपिकल तसंच व्हेक्टर बॉर्न डिसीजचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव यांनीही या लसीच्या मानवी चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. ही लस दिलेल्या मानवी स्वयंसेवकावर कसलाही विपरित परिणाम झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ही लस मानवी वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं.
जगभरात कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसीवर 140 ठिकाणी संशोधन सुरु आहे, त्यापैकी तब्बल 11 संशोधनांना मानवी चाचण्यांची परवानगी आहे. रशियाच्या सेशेनोव्ह विद्यापीठात सुरु असलेल्या मानवी चाचण्या या चाचण्यांपैकीच एक होत्या.