पुणे- कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI ) कोविशील्ड लसीची निर्मिती केली आणि दिलासा मिळाला. मात्र, लसीच्या दरावरून वाद निर्माण झाला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला एका लसीचा डोस 150 रुपये, खाजगी हॉस्पिटलला 600 तर सरकारी रुग्णालयांना 400 रुपये दर जाहीर केल्यापासून हा वाद निर्माण झाला असून हा दर देशात एकसमान असावा अशी मागणी काहींनी केली आहे. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी राज्य सरकारसाठी लसीच्या एका डोससाठीची किंमत 100 रुपयांनी कमी करून 300 रुपये केल्याचे जाहीर केले. असे असले तरी आदर पूनावाला यांना धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे . यामध्ये चार ते पाच सशत्र कमांडो, पूनावाला यांना, ते जेथे जेथे देशभरात जातील तेथे सुरक्षा देणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या सिरम मध्ये सरकार व नियमन कार्य प्रमुख म्हणून काम करणारे प्रकाशकुमार सिंग यांनी १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिले होते. त्यात पूनावाला यांना लस आपूर्ति वरून विभिन्न समूहांकडून धमक्या मिळत असून त्यांच्या जीवाला धोका आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे पूनावाला यांना सुरक्षा दिली जावी अशी विनंती पत्रात करण्यात आली होती. केंद्राने परिस्थिती लक्षात घेऊन पूनावाला याना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यात सीआरपीएफचे कमांडो पूनावाला यांच्या तैनातीत राहणार आहेत.