नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात मानाच्या मानल्या जाणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ 100 ग्रॅम वजन वाढल्याने 50 किलो वजनी गटात गोल्ड मेडलच्या जवळ पोहोचलेली कुस्तीपटू विनेश फोगाट हिला स्पर्धेतून बाहेर जावं लागल्याने देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. भारताच्या हातातोंडाशी आलेलं मेडल हिरावून घेतल्यामुळे भारतीयांकडून निराशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 50 किलो वजनी गटात आता फक्त गोल्ड आणि ब्राँझ ही दोनच मेडल असतील. दरम्यान, यावरून अनेक चर्चांना उधान आले आहे तर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहे.
प्रत्येक सामन्याआधी खेळाडूचं वजन केलं जातं. काल झालेल्या सामन्याआधी विनेशचं वजन 50 किलो होतं. पण आज सकाळी झालेल्या वजन चाचणीत विनेशचं वजन 100 ग्रॅमनी जास्त भरलं. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पदक तांत्रिक कारणामुळे भारताने गमावलं.
यापूर्वी विनेश 50 हून अधिक वजनी गटात खेळली आहे. ती 55 वजनी गटात खेळली होती. मात्र ऑलिम्पिकमध्ये 50 वजनी गटात खेळण्यासाठी तिने वजन कमी केलं होतं. त्यामुळे वाढलेलं वजन कमी केल्यानंतर लवकर वाढण्याची शक्यता अधिक असते. असे असले तरी विनेशचं वजन आधीच नियंत्रणात का आणलं नाही, तिच्या कोचला याबाबत माहिती नव्हती का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. काल 6 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात तिचं वजन नियंत्रणात होतं. मात्र 24 तासात तिचं वजन वाढल्याचं लक्षात आलं होतं. ती रात्रभर जागीच होती. रात्रभर ती दोरी उड्या मारणं तत्सम प्रकारांचा अवलंब करीत होती. वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत होती. परंतू तिचं वजन अपेक्षित कमी झालं नाही. दरम्यान कालचा सामना झाल्यानंतर तिच्या खाण्याकडे नीट लक्ष देण्यात आलं नव्हतं का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
असे ठेवतात खेळाडू आपलं वजन नियंत्रणात
शेवटच्या 12 तासात वजन कमी कसं करायचं याच्या ट्रिक्स खेळाडूंना माहिती असतात. कुस्तीपटू असो किंवा बॉक्सर, रात्रीच्या वेळेत प्रत्येक खेळाडूच्या वजनात वाढ होते. अशावेळी अनेक कुस्तीपटू स्वतःभोवती उब देणारी चादर गुंडाळून राहतात, पाणी कमी पितात. यातून शरीरातील पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. खाल्लं तर वजन वाढण्याची भीती असते. अशावेळी आहारतज्ज्ञ आणि कोचच्या सल्ल्याने खेळाडू आपलं वजन नियंत्रणात ठेवतात.