पुणे – ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा महिलांचा नारदीय कीर्तन महोत्सव रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० ते ८.०० या वेळेत श्री हरीकीर्तनोत्तेजक सभेचे व्यास सभागृह (सदाशिव पेठ) येथे संपन्न झाला. पुणे फेस्टिव्हल मधील कीर्तन महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. त्यामध्ये “वंदे विनायकम्” हा कार्यक्रम सादर झाला.
दोन सत्रात हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन केले. सर्व सहभागी महिला कीर्तनकारांचा सत्कार करून त्यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रेया वैद्य, दयानंद घोटकर, कीर्तनकलानिधी ह.भ.प रामचंद्रबुवा भिडे यांनी सर्वांना आशीर्वाद दिले. कीर्तन महोत्सवाच्या अध्यक्षा ह.भ.प नंदिनी पाटील यांनी कीर्तन महोत्सवाचे उद्घाटनपर भाषण केले. त्यांनी कीर्तन परंपरा आज काल उद्या कालानुरूप झालेले बदल सांगितले.
दुसऱ्या सत्राची सुरुवात नमनाचे श्लोक, सामुहिक नारदीय नमन, जयोस्तुते श्री महन मंगले हा अभंग आणि त्यावर आधारित पूर्वरंग सादर झाला. त्याला अनुसरून उत्तररंगात महिलांची चक्री आख्याने, झाशीची राणी, महाराणा प्रताप आणि वी.दा. सावरकर या राष्ट्रीय क्रांतीकारकांची चरित्रात्मक आख्याने व ३ बाल आख्याने असे विषय सादर झाली.
यात अनुक्रमे बालकीर्तनकार ४ वर्षीय लोपामुद्रा सिंग हिने गणपती स्तवन गायले, बालकीर्तनकार कौमुदी मराठे हिने शिरीष कुमार हे अख्यान तर बाल कीर्तनकार अनुश्री ब्रम्हे हिने विवेकानंद आख्यान सांगितले. युवती कीर्तनकार तन्मयी मेहेंदळे हिने जयोस्तुते श्री महन्मंगले हा अभंग सादर केला. ह.भ.प. अर्चना कुलकर्णी यांनी महाराणा प्रताप हे सादर केलेले आख्यान आणि ज्येष्ठ कीर्तनकार व गुरु ह.भ.प. निर्मला जगताप यांच्या झाशीची राणी मणिकर्णिका अख्यानाने रसिकांची वाहवा मिळवली. संयोजिका कीर्तन विशारद ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे यांनी वि.दा सावरकार हे अख्यान सादर केली. यानंतर सामुहिक भैरवी व आरती करण्यात आली. यावेळी संध्या साठे (तबला), प्रांजली पाध्ये (हार्मोनियम), आणि सहगायन माधवी राजे यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हरीकीर्तनोतेजक सभेच्या उपाध्यक्ष ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. नंदिनी पाटील यांनी भूषविले. प्रसिद्ध गायक दयानंद घोटकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. अॅड. धनदा कुलकर्णी – गदगकर यांनी केले. नचिकेत मेहेंदळे यांनी आभार मानले.
पुणे फेस्टिव्हल सारख्या सांस्कृतिक महोत्सवात आपल्या वैभवशाली कीर्तन परंपरेचे दर्शन व्हावे यासाठी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी आम्हाला सदैव प्रोत्साहन दिले असे यावेळी संयोजिका निवेदिता मेहेंदळे म्हणाल्या. यावेळी ह.भ.प प्रेमा कुलकर्णी, ह.भ.प जयश्री देशपांडे, मोहन शिंदे, वेदांग हुले यांचे विशेष सहाय्य लाभले.
या नारदीय कीर्तन महोत्सावचे मुख्य प्रायोजक वैद्य जेम्स आणि डायमंड्स होते तसेच ३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, सिंहगड इन्स्टिट्यूट, बढेकर ग्रुप हे उपप्रायोजक आहेत.