पुणे(प्रतिनिधी)– राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या मातोश्रींनी शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याचा आशावाद व्यक्त केला असतानाच पक्षातील अन्य नेत्यांनीही हाच सूर आळवल्याचे दिसत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात पवारसाहेब आणि अजित दादा पुन्हा एक होतील आणि राष्ट्रवादीचे एकीकरण होईल, अशा चर्चांना उधाण आले आहे.
2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादा 41 आमदारांना सोबत घेऊन महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. पक्ष आणि चिन्हदेखील दादांनाच मिळाले. मात्र, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी आपले नेतृत्व सिद्ध करीत 10 पैकी 8 खासदार निवडून आणून दाखवले. बारामतीतूनही अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून सुप्रिया सुळे विजयी झाल्या. तर विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी जोरदार कमबॅक करीत केवळ 58 जागा लढवून 41 आमदार निवडून आणले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होती. अशातच अजितदादांच्या मातोश्री आशाताई पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवीन वर्ष सगळय़ांना उत्तम आणि चांगले जाऊ दे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ देत, असे साकडे आशाताई पवार यांनी विठुरायाला घातले आहे. मला वाटते हे दोघेही एकत्र येतील. मी तशी पांडुरंगाला प्रार्थना केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजितदादांच्या घरातून एकीकरणाला सुरुवात झाल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये पॅचअप होण्याच्या शक्मयता बळावल्या आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कौटुंबिक दरी फार रुंदावणार नाही, याची दक्षता पवार कुटुंबीयांनी घेतली होती. त्यामुळे ही दरी पुन्हा सांधू शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार आणि अजितदादा एकत्र येणे ही चांगली गोष्ट असल्याचे म्हटले आहे. शरद पवार हे आमचे दैवत आहे. आम्ही वेगळे झालो असलो, तरी आजही आमच्या मनात त्यांच्याविषयी आस्था आहे. भविष्यात पवार कुटुंबीय एकत्र आले, तर त्यात काही गैर नसेल, अशा शब्दांत पटेल यांनी राष्ट्रवादी एकीकरणाच्या चर्चेवर आपले मत मांडले आहे. तर अजितदादा गटाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी शरद पवारांसमोर लोटांगण घालण्याचीच भाषा केली आहे. बजरंगाच्या छातीत प्रभू श्रीराम दिसतील, तसे माझ्या छातीत शरद पवार दिसतील, असे झिरवळ यांनी म्हटले आहे. साहेबांना मी फसवले. मात्र, हा निर्णय घेणे भाग पडले. आता साहेबांच्या पाया पडणार. आमच्यासारख्या अनेकांचे अवघड झाले आहे. पण, साहेब विचार करतील, असे सांगत दोन्ही नेते एकत्र येतील, अशी विनवणी आपणही पेंडुरंगाचरणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचे मतप्रदर्शन म्हणजे राष्ट्रवादीच्या एकीकरणासाठी सुरू असलेली वातावरणनिर्मिती मानली जात आहे.
दुसऱया बाजूला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय शरद पवार आणि अजितदादा पवार या दोघा नेत्यांनीच घ्यायचा आहे. भाजपकडून कोणताच करार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रात भाजपाला काठावर बहुमत मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी एकसंध झाली, तर ते भाजपसाठी उपयुक्तच ठरू शकते. केंद्रातले त्यांचे स्थान आणखी बळकट होऊ शकते. हे पाहता या प्रक्रियेमध्ये झालीच तर भाजपाची भूमिका मदतीची असू शकते, असे सांगण्यात येत आहे.
असे असले, तरी शरद पवार यांनी यावर अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. शुक्रवारी एका कार्यक्रमात शरद पवार, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील ही मंडळी एकत्र येत आहेत. त्यामुळे एकीकरणाच्या प्रक्रियेला आता सुरुवात होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.