पुणे(प्रतिनिधि)– पक्ष सोडल्यापासून मी कोणाचाही विचार केला नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर मी बोलू शकत नाही, असं म्हणत पुण्यातील मनसेला नुकताच रामराम ठोकून वंचित आघाडी कडून पुणे लोकसभा लढवत असलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर कोणतंही उत्तर देणं टाळलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देणार असं जाहीर केलं. त्यानंतर वसंत मोरेंनी योग्य निर्णय घेतला, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. राज ठाकरेंच्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यासोबत त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, शहराचा विकास करणं अशक्य नाही आहे. रवींद्र धंगेकरांनी विकास केला असेल तर लोक त्यांना नक्की मतदान करेल. मी सहासी विधानसभा मतदार संघाचा सगळा अभ्यास केला आहे. मी खासदार झालो की संपूर्ण शहराचा विकास करणार आहे. विकासाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीने पुणेकरांना गृहीत धरण बंद करावं, असं ते म्हणाले आहेत. कसबा पॅटर्न पेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात चालेल. भाजपचं चारशे पाच स्वप्न स्वप्नच राहणार आहे. माझा फॉर्मुला ३० तारखेनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. मी शंभर टक्के पुण्यातून आघाडी घेणार असल्याचा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.