पुणे(प्रतिनिधी)–बीड येथील मस्सा जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्येची घटना ही माणुसकीला कलंक लावणारी आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड हा तब्बल 20 दिवसानंतर स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेला आहे. आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तीन आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी अटक केली पाहिजे. त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला कडक कलम लावून शिक्षा करावी, अशी सर्वांचीच मागणी असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आठवले म्हणाले, बीड जिल्हय़ात गुंडागर्दी, खंडणी मागणाऱया टोळीने उच्छाद मांडला आहे. उद्योग व्यवसाय करणाऱया लोकांना त्रास देणे, हा खंडणीखोरांचा प्रमुख उद्योग आहे. अशा खंडणीखोरांचा प्रस्थ वाढणे, ही बाब गंभीर असून अशा लोकांना कडक शासन झाले पाहिजे. बीड जिह्यात वाल्मिक कराड हा कार्यकर्त्यांच्या नावाने गुंडगिरी करणारा आहे. आता त्याला अटक करण्यात आली असून त्याला शिक्षा झालीच पाहिजे. बीड जिह्यात शांतता ठेवायची असेल, तर वाल्मिक कराड याला अद्दल घडवावीच लागेल. या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावे
अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावे, ही अमाचीपण इच्छा आहे. पवार साहेबांनी महायुती सोबत यावे. काँग्रेसपेक्षा साहेब महायुतीसोबत आले, तर चांगले राहील, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले.