पुणे(प्रतिनिधि)–केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील कर्मचारी देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे टोळीतील तिघांना अटक केली आहे. अमोल तापकीर, ओम तीर्थराम, किरण पडवळ अशी तिघांची नावे आहेत. तर बाबू पवार हा गजा मारणेचा भाचा फरार आहे. या चौघांविरोधातही भारतीय न्याय संहिता कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शिवजयंतीदिवशी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती. तर देवेंद्र जोग कोथरूडमधील भेलके नगर परिसरातून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी चौघांनी देवेंद्र जोग यांना कट मारला. याच गोष्टीवरून जोग आणि चौघा आरोपींमध्ये वाद झाला. चौघांनीही गाडीचा धक्का लागला असे म्हणत जोग यांना बेदम मारहाण केली. यात त्यांच्या नाकाला नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका बाजूला पुण्यातील गँगवॉर कंट्रोल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचे पोलिसांना कडक निर्देश आहेत. पण टोळ्यांची दादागिरी सुरूच असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. या घटनेनंतर केंद्रीय मुरलीधर मोहोळ यांनी जखमी असलेल्या कर्मचाऱ्याची व्हिडिओ कॉलवर विचारपूस केली आहे. जोग मोहोळ यांच्या कार्यालयामध्ये सोशल मिडियाचे काम करतात.