पुणे-अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील औरंगजेब फॅनक्लबचे नेते आहेत, अशी खोचक टीका अमित शाह यांनी केली. “नरेंद्र मोदी यांनी तृष्टीकरणाच्या ऐवजी सर्वांना न्याय देण्याचं काम करत देशाच्या संरक्षणाला सुनिश्चित केलं आहे. आतंकवादला मुळासकट फेकून टाकण्यासाठी निर्णय घेतले आहेत. मी त्याचा साक्षीदार आहे. देशाच्या सुरक्षेला औरंगजेब फॅन क्लब सुनिश्चित करु शकत नाही. भाजप करु शकते. औरंगजेब फॅन क्लब कोण आहे? आघाडीवाले आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत, श्रीमान उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेता बनले”, असा घणाघात अमित शाह यांनी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात बोलताना केला.
“स्वत:ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारस म्हणवणारे उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत. उद्धवजी याकूब सोडवण्याची मागणी करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही बसला आहात. झाकीर नाईकच्या समर्थकांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात. संभाजीनगरचा विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. हा औरंजेब फॅनक्लब महाराष्ट्र आणि देशाला सुरक्षा देऊ शकते का?”, असा सवाल अमित शाह यांनी केला. “देश आणि महाराष्ट्राला सुरक्षा ही केवळ भाजप देऊ शकते”, असा दावा अमित शाह यांनी केला.
बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान इंग्रजांनी केला नव्हता तेवढा कॉँग्रेसने केला
“बंधू आणि बघिणींनो मी नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत आलो आहे. मी अभ्यासाच्या आधारावर सांगू शकतो की, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान जितका काँग्रेसने केला आहे तितका इंग्रजांनी सुद्धा केला नव्हता”, असा आरोप अमित शाह यांनी केला. “ही गोष्ट आपल्याला घरोघरी जावून सांगायची आहे. बाबासाहेबांशी जोडलेले ५ तीर्थ बनवण्याचं काम भाजप पक्षाने केलं. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार काँग्रेस पक्ष असताना मिळाला नाही. नरेंद्र मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करायला सुरुवात केली. बाबासाहेबांच्या आठवणीत दिल्लीतही त्यांचं भव्य स्मारक बनवण्याचं काम सुरु आहे”, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.
“भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने देशाच्या सुरक्षेला सुनिश्चित केलं आहे. देशात दशकांपासून असलेल्या नक्षलवादाच्या त्रासाला आता समाप्तीच्या मार्गावर आणला आहे. मी आज आपल्याला सांगून जातो की, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही सांगता की, पुढच्या दोन वर्षात हा देश नक्षलवाद्यांपासून मुक्त होणार. यात कोणतीच शंका नाही”, असा दावा अमित शाह यांनी केला.