पुणे : देशाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान देणा-या राष्ट्रपुरुषांना न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे अनोखी मानवंदना देण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने ४० बाय ८० फूट आकारातील भव्य चित्रांद्वारे तब्बल २०० विद्यार्थ्यांनी या राष्ट्रपुरुषांना मानवंदना दिली. या अनोख्या उपक्रमात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची रेखाचित्रे देखील विद्यार्थ्यांनी काढली.
संस्थेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात २० बाय ४० फूट आकारातील दोन भव्य चित्रे काढण्यात आली होती. याकरिता मागील एका आठवडयापासून २०० विद्यार्थी तयारी करीत होते. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी याकरिता विशेष मार्गदर्शन केले.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने वेगळा उपक्रम व्हावा, या संकल्पनेतून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ४० बाय ८० फूट आकारात दोन भव्य चित्रे साकारण्याकरिता त्या चित्राचे वेगवेगळे प्रत्येकी ५० भाग करण्यात आले आणि नंतर ते एकमेकांना जोडण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात या राष्ट्रपुरुषांनी केलेले कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे, याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटतर्फे सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.