पुणे : आजचा आदिवासी हा मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे. तो आर्थिक सक्षम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आदिवासी साहित्यातून आलेले चित्रण हे पोरकेच ठरेल. आदिवासी साहित्यानेही आदिवासींच्या उन्नतीसाठी, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वप्रथम प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आदिवासी विकास संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग, इंद्रायणी महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शतकातील आदिवासी साहित्य : स्वरूप आणि वाटचाल’ या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून रामदास काकडे बोलत होते. चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ कवी व साहित्यिक वाहरू सोनवणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, बीजभाषिक डॉ. संजय लोहोकरे, उद्घाटक कवी वाहरू सोनवणे, इंद्रायणी विद्या मंदीर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, आंतरविद्याशाखीय अधिष्ठाता डॉ.प्रभाकर देसाई, मराठी विभागप्रमुख डॉ.तुकाराम रोंगटे, नामवंत समीक्षक, कवी, संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते.
चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका तसेच चर्चासत्र आयोजित करण्यासाठी विद्यापीठाने व इंद्रायणी महाविद्यालयाने घेतलेला पुढाकार यासंदर्भात डॉ. तुकाराम रोंगटे यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आदिवासी साहित्याबद्दल सजगता आणि जागृती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
वाहरू सोनवणे म्हणाले, की मूल्याधिष्टीत समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे.
उद्घाटन सत्राचे बीजभाषक म्हणून डॉ. संजय लोहोकरे यांनी आपली व्यापक भूमिका स्पष्ट केली. व्यापक परिप्रेक्षातून आदिवासी साहित्याकडे बघायला हवे. साहित्याच्या प्रवाहांमध्ये आदिवासी साहित्य व आदिवासी इतर साहित्य या दोन साहित्य प्रवाहांचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी आदिवासी समाजाची जीवन व्यवस्था ही मुळातच समताधिष्टित असून, समतेच्या न्यायाने या समाजाकडे बघण्याची दृष्टी प्रगल्भ व्हायला हवी, असा आशावाद व्यक्त करीत उद्घाटन सत्राचा समारोप केला.
सूत्रसंचालन प्रा. संदीप कांबळे व प्रा. सत्यजित खांडगे यांनी केले.