पुणे–कोविड काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामगिरीचं कौतुक परदेशात झाले. केंद्र सरकारनेही महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी करत असलेल्या कामाचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. असं असताना मुख्यमंत्री बदलण्याची जी काही मागणी होत आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील अनेक दिवसांपासून सक्रिय नसल्यामुळे कार्यवाह मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कुणाला तरी जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने भाजपकडून करण्यात येते. त्यावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. पुण्यातील वारजे परिसरात एका कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, विरोधकांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांनी बोलत राहावं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचं काम करत राहतील. महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात केलेल्या कामगिरीचं कौतूक परदेशात झालं आणि केंद्र सरकारनेही केलं आहे. त्यामुळे विरोधकांच्या या मागणीला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. राज्यासमोर दुसरी अनेक महत्त्वाची कामं असून महाविकास आघाडीचे सर्व मंत्री कामात व्यस्त आहेत.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. शरद पवारांना त्यांच्याच केंद्र सरकारनेच पद्म पुरस्कार दिला होता हे फडणवीस पवारांवर टीका करताना विसरले, असा चिमटा त्यांनी काढला.
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि जयंत चौधरींकडे आम्ही अपेक्षेने पाहत आहोत. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारकडून अपेक्षित काम झालेले नाही. त्याची जाहिरात मात्र खूप झालीय, असा चिमटा त्यांनी काढला.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीला पलकमंत्री, पुण्यातील सर्व खासदार, आमदार आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत. यासाठी खासदार बापट आणि शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.