जानेवारी २०२१ नंतर कोरोना संसर्ग आटोक्यात येतोय असे वाटत होते परंतू मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढू लागलेली कोरोना संसर्गबाधितांची संख्या पाहता मनात अनेक गंभीर प्रश्न उभे राहू लागले आहेत. १ मार्च ते २० मार्च या कालावधीत रुग्ण संख्या पाच पटीने वाढली आहे.
◆ अगदी पहिल्या लॉकडाऊनपासून आजपर्यत, समुपदेशक म्हणून मी मानसिक अस्वस्थतेच्या अनेक केसेस हाताळत आहे. भीती, नैराश्य, काळजी, एकटेपण, चिंता, ताण यातून निर्माण होणारे असे किती तरी मानसिक स्तरावरील प्रश्न या संसर्गाने लोकांच्या मनात उभे केले होते. मात्र आता आलेल्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत समाजाची एक वेगळीच मानसिकता व मनःस्थिती दिसत आहे. सगळीकडे उसळणारी गर्दी पाहता आपण ‘शिस्त, जबाबदार वर्तन व सामुहिक जबाबदारी’ जणू विसरलो आहोत का? असा प्रश्न पडतो.
◆बेफिकिर, बेपर्वा, बेशिस्त, बेजबाबदार या शद्बांपलिकडच्या भावना अनेकांच्या वर्तनात आज ठळकपणे दिसत आहेत.◆
◆ मध्यंतरी एका बँकेतील १५ कर्मचारी (एकाच दिवशी) संसर्गित असल्याचे निदान झाले, उर्वरित कर्मचारी संभव्य संसर्गित यादीत आहेत. संबंधितांचे कुटुंबीय संसर्ग धोक्याच्या कक्षेत आहेतच. पुण्यातील एका भागातील २० कार्यकर्ते पॉझिटिव्ह निघाले, त्यांच्या संपर्कातील अनेकजण बाधित झाले. ट्रेसिंगचा अभाव व स्वतःला संसर्ग झाल्याचे लपविण्याची वृत्ती याला कारणीभूत ठरत आहे. नक्की कोणाकडून दुर्लक्ष झाले हे शोधणे अवघड आहे. मात्र याचा थेट परिणाम रुग्ण संख्येच्या वाढीवर व भविष्यातील धोके गडद करण्यात झाला आहे. काही प्रमाणात दुर्लक्ष व बेफिकिरवृत्ती यास कारणीभूत ठरली आहे.
◆◆◆ देशात कोरोना संसर्गाची संख्या वाढत असून गेल्या गुरुवारी देशभरात ३५ हजार ८७१ नवे कोरोना रुग्ण आढळले. गेल्या शंभर दिवसातील ही विक्रमी रुग्णसंख्या होती. यापूर्वी ६ डिसेंबर २०२० रोजी ३६,०११ इतके कोरोना रुग्ण एका दिवसात आढळले होते. आज देशातील रुग्णसंख्या १ कोटी १४ लाखांच्या वर आहे तर एकूण मृत्यू १ लाख ५९ हजार २१६ इतके आहेत. महाराष्ट्रातील १३ जिल्हे हे तीव्र संसर्गबाधित झाले आहेत.
◆ पुण्यातही गुरुवारी, १८ मार्चला २ हजार ७५२ इतकी उच्चांकी रुग्णवाढ झाली. गेल्यावर्षी १७ सप्टेंबर रोजी सर्वाधिक २४ हजार ८८६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. अवघ्या आठवडयाभरात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दहा हजाराने वाढ झाली आहे. हे चित्र नक्कीच चिंताजनक आहे.
◆ राज्यात कोरोना संसर्गामुळे बाधितांच्या संख्येचे नव-नवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. पुणे शहरात दिवसाला अकरा हजारांहुन अधिक स्वॉबचे नमुने तपासले जात आहेत, त्यापैकी ८० टक्के नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासण्यात येतात. त्यापैकी ५० टक्के हे पॉझिटिव्ह येत आहेत. यावरून स्थानिक आरोग्य यंत्रणा व खासगी यंत्रणेत उभा राहिलेला वाद आता ‘क्रॉस चेकिंग’ पर्यत गेला आहे. या वादातून संसर्ग खरा का खोटा? या वादात न पडता प्रतिबंधात्मक उपायांसह, सर्तक राहणे आज खूप महत्वाचे आहे. मात्र लक्षणे दिसताच किंवा शंका असल्यास स्वतःच self diagnosis व self treatment करण्याकडे मात्र नक्कीच वळू नये. यातून फक्त वाढेल तो स्वतःच्या जीवाला धोका, संसर्ग व रुग्णसंख्या.
◆ प्रसादला चार दिवस सर्दी-ताप होता. तपासणीत तो पॉझिटिव्ह निघाला. सारिका, निलमताई व चिमुकला रोहन यांचा निरोप घेऊन प्रसाद दवाखान्यात अॅडमिट झाला. चार दिवसांनी सारिकात लक्षणे दिसू लागली व तिलाही दवाखान्यात अॅडमिट व्हावे लागले. पुढील दोन दिवसात निलमताई संसर्गित आढळून आल्या व त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.
◆ एकाच कुटुंबातील चार पैकी तीन सदस्य, तीन वेगवेगळ्या दवाखान्यात अॅडमिट आहेत व रोहन घरात एकटा. दुदैवाने तीनपैकी दोनजण अतिदक्षता विभागात आहेत. मागे एकट्या राहिलेल्या चिमुकल्या रोहनकरिता त्याची आत्या चेन्नाईहून आली.
◆◆ नक्की काय व कुठले चुकले?◆◆
कुटुंबातील एकजण बाधित आहे हे निदान झाल्यानंतर खरं तर सर्वांनी त्वरित तपासणी करून घेणे गरजेचे होते. संर्सगाला very easy व too casual घेण्याची ही शिक्षा होती. या कुटुंबामार्फत अजून कोणाकोणाला संसर्ग झाला आहे हे अजून कळलेले नाही. मात्र दुर्लक्ष व बेफिकिरवृत्तीमुळे प्रसादचे सर्वच कुटुंबीय आज मोठ्या संकटात सापडले आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला इतरांना देण्यापूर्वी तो प्रत्येकाने स्वतः कृतीत आणणे गरजेचे आहे.
◆ आज सगळेच घराबाहेर पडत आहेत. काही गरजेकरिता तर काहीजण निमित्त शोधत. आज होणारी लग्नकार्य, मेजवान्या, खरेदी, पर्यटन, सामाजिक कार्यक्रम, राजकीय सभा/आंदोलने इत्यादी पाहता ‘संसर्ग गेला पळून’, असे सर्वसामान्यपणे सर्वांना वाटू लागले आहे. परंतु याचा थेट परिणाम म्हणजे रुग्णसंख्येचे वाढते उच्चांक हा आहे. याकडे मात्र आपल्या सगळ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. ही स्थिती अधिक बिकट झाली तर मात्र शासनाला ‘लॉकडाऊन’ करण्याशिवाय पर्याय उरणार नाही हे नक्की. त्यामुळे समाज म्हणून ‘सामुहिक जबाबदारी’ला अनन्य साधारण महत्व प्राप्त होते.
◆ अनेक देशांना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या नियंत्रित करण्याकरिता हा मार्ग पत्करावा लागलेला आहे.
एखादा व्हायरस आला व त्याची शरीराला लागण झाली, इथपर्यंत हा संसर्ग सिमित नाही त्याची एक मानसिक बाजूही आहे. कोणत्याही साथीच्या आजारात किंवा महामारीत लोक हा संसर्ग किती समजून घेतात? हा संसर्ग रोखण्याकरिता काय प्रयत्न करतात? संसर्ग वाढू नये म्हणून काय जबाबदारी घेतात? हे फार महत्वाचे ठरते. आज याकडे मात्र दुर्लक्ष झाल्यास अनेक लोकांना मागील वर्षाप्रमाणे मानसिक स्तरावरील अस्वस्थता /अस्थिरता व मानसिक आजारांना देखील नक्कीच सामोरे जावे लागणार आहे.
◆ ◆ ◆ ◆ ◆ सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, गर्दीत न जाणे व शंका येताच तपासणी करणे या पंचसूत्रीचा* जणू आज सगळ्यांना विसर पडलेला दिसत आहे. ‘दंड भरू पण मास्क नाही वापरणार’ ही वृत्तीही अधिक बळावत आहे.
◆ आज दवाखान्यात बेड मिळणे अवघड होत आहे, (एकूण रुग्णसंख्येपैंकी २ टक्के संख्या अतिदक्षता विभागात (यांना मृत्यूचा धोका कायम आहे) उपचार घेत आहे. शहरातील विलगीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरु झालेली नाहीत, लक्षणे दिसू लागली तरी लोक दुर्लक्ष करीत आहेत, गृह विलगीकरणातील रुग्ण राजरोसपणे बाहेर हिंडत आहेत… कसा काय करणार आपण हा संसर्ग नियंत्रित? आज हा संसर्ग शहरातील नागरी वस्तीत मध्यम व उच्च मध्यमवर्गीय सोसायट्यांमधे मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
◆ सुदैवाने पहिल्या संसर्गाच्या लाटेत लहान मुले व काही प्रमाणात ज्येष्ठ नागरिक सुरक्षित होते परंतु आज लहान मुले ‘कॅरियर’ म्हणून कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांपर्यत संसर्ग पोहचवीत आहेत. त्यामुळे लहान मुलांना देखील योग्य मार्गदर्शन व सूचना देणे गरजेचे आहे तर ज्येष्ठांनी कोणतीही भीति न बाळगता लस घेणे गरजेचे आहे.
◆ मागील वर्षाच्या अनुभवातून, आज जमेची बाजू म्हणजे रुग्णांवर नेमके काय उपचार करायचे याचा अंदाज वैद्यकीय तज्ञांना आला आहे. परिस्थिती हाताळण्याकरिता शासन व वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे परंतु आपणही काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे.
◆ धोक्याची घंटा वाजत आहे. ती ऐकून, यापुढे जबाबदार व सर्तक रहायचे, का न ऐकल्यासारखे करीत बिनधास्तपणे जगा (मरा)यचे? याचा आज आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे.
लक्षात असू दया, वेळ कोणासाठीही थांबत नाही, अगदी तुमच्या माझ्यासाठीही नाही.
◆◆ हे नक्की करा ◆◆
◆ गर्दीत जाणे टाळा..
◆ सामाजिक अंतर राखा…
◆ लक्षणे दिसताच तपासणी करा…
◆ स्वतःच्या बचावाकरिता प्रतिबंधनात्मक नियम पाळा…
◆ गृह विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी खोलीबाहेर पडू नये (यामुळे संसर्ग वाढू शकतो)…
◆ पुरेशी झोप, विश्रांती व सकस आहार घ्यावा, व्यसनांपासून दूर रहावे …
◆ वैद्यकीय तज्ञांच्या सूचनांचे पालन करा …
◆ आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना तपासणी करण्यास सांगा …
‘◆ मी जबाबदार’ हे विधान आता जाहिरातींपुरते सीमित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत दिसणे गरजेचे आहे अन्यथा अनेक कडक निर्बंधांना आपल्याला सामोरे जावे लागेल हे नक्की.
◆◆!!माझा मास्क, माझी जबाबदारी!!◆◆
सर्तक रहा, आरोग्यपूर्ण रहा.
◆स्मिता बाळकृष्ण कुलकर्णी, ज्येष्ठ समुपदेशक – समर्थ भारत