
पुणे- वेद, उपनिषेद आणि षडदर्शनांसारख्या तत्त्वज्ञानांतून जगाला महान संस्कृती देणारा भारत देश असताना आपण मात्र निद्रिस्त राहिलो. आपल्यामध्ये खोट्या गोष्टी परकीयांनी ठसवल्या. त्यासाठीच आता आपल्या पारंपरिक ज्ञानाचे पुनरुत्थान व्हायला हवे. बालपणापासून हे संस्कार मुलांवर करण्याचे कार्य उद्याची उज्वल स्वप्ने पहाणाऱ्या ‘पुनरुत्थान विद्यापीठा’ सारख्या संस्थांच्या उपक्रमातून ते नक्की पूर्ण होतील, असा विश्वास ज्येष्ठ मूर्ती व पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केला.
देगलूरकर यांच्या उपस्थितीत पुनरुत्थान विद्यापीठ अहमदाबादच्या पुणे केंद्रातर्फे भारताची विकासाभिमूख श्रेष्ठ संस्कतीच्या विचाराचा पुरस्कार करणाऱ्या १०५१ ग्रंथांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारणीचे सदस्य अनिरुद्ध देशपांडे होते. यावेळी पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती इंदूमती काटदरे आणि संस्थेच्या पुणे केंद्र संयोजक चित्रा मोहरीर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजूषा लिमये यांनी केले, तर पद्य गायन दीक्षा सुपेकर हिने केले असून आभार संयोजक अपूर्व सोनटक्के यांनी मानले. यावेळी अनुवादकांपैकी संगीता सोमण, वर्षा फडणीस आणि डॉ. कांतीबहन लोदी उपस्थित होते. भारतीय शिक्षणासंबंधी विचारमंथन करण्यासाठी पुनरुत्थान विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या विद्वतसभेत ५३ अभ्यासक सहभागी झाले.
डॉ. देगलूरकर पुढे म्हणाले की, आठव्या शतकापासून देशाला स्वातंत्र मिळालेल्या १९४७ सालापर्यंत विविध परकीय आक्रमणांमुळे आपल्यावरील झालेले कुसंस्कार मिटवून मूळ संस्कार निर्माण करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सांस्कृतिक दृष्ट्या आता कुठे जाग येत असताना आपली मूळ संस्कृती लहान वयातील मुलांपर्यंत रुजवायला हवी. वेदकाळापासून आपली आकाशापर्यंत घेतलेली झेप व निर्माण केलेल्या मूर्ती व मंदिरातून व्यक्त झाली. आपल्या परंपरा जुन्या नसून नित्य नूतन आहेत, अयोध्येतील राम मंदिरातील रामाच्या मूर्तीच्या पुनरुत्थानाचा समाजमानसावर मोठा प्रभाव पडला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्तविकात बोलताना कुलपती इंदूमती काटदरे म्हणाल्या की, आपल्या देशात मूळ भारतीय शिक्षणाची प्रतिष्ठा व्हावी यासाठी पहिल्यापासून प्रयत्न झाले. स्वातंत्रपूर्व काळातही राष्ट्रीय शिक्षणाचे महत्व लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधींनी मांडले होते. आज पाश्चात्यीकरणाकडे गेलेल्या शिक्षणाचे भारतीयीकरण होण्यासाठी पुनरुत्थान विद्यापीठ त्यातील अध्ययन, अभ्यासक्रमासाठी संशोधन, संदर्भसामुग्री तयार करण्यासाठी विद्वानांनांबरोबर विचार विनिमय करत आहे. शिक्षण हे स्वायत्त व शासनमुक्त व्हायला हवे. तसेच शिक्षणातील वेदकाळापासूनचा अध्यात्मनिष्ठ विचार आजच्या कालखंडाला अनुकुल बनवताना तो एकात्म, समग्र विकासावर आधारलेला असेल, असे आमचे उद्दीष्ट आहे. यासाठी निवडण्यात आलेल्या १०५१ ग्रंथांचे हिंदीत अनुवाद करण्यासाठी ३६० अनुवादकांनी सहभाग घेतला असून २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी त्यासाठी योगदान दिले. पुढील साठ वर्षांमध्ये देशात शिक्षण घेणाऱ्या दहा पिढ्यांसाठी हे काम उपयोगी ठरेल, असे त्यांनी सांगितले.












