पुणे(प्रतिनिधी)–आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढविणार असून, निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे काँगेस पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्हय़ांच्या आढावा बैठकीसाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते. चेन्निथला म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आघाडी प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील वातावरण बिघडत आहे समाजातील विविध घटकांचे प्रश्न सुटले नाहीत. शासनाचे त्याकडे लक्ष नाही. या सर्व बाबी निवडणुकीच्या प्रचारात जनतेसमोर मांडल्या जाणार आहेत. याचा परिणाम म्हणून आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणुकीला एकत्रितरीत्या सामोरे जाऊ. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण राहणार, याचा निर्णयही निवडणूक निकालानंतरच बैठकीत सर्वानुमते घेतला जाईल. राज्यात सध्या परिवर्तनाचे वारे वाहत आहे. त्यामुळे सत्ताबदल होणार, हे निश्चित आहे.
राज्यातील अति पावसाचा शेतीवर परिणाम होत असून याबाबत राज्य शासनाने तातडीने सर्वेक्षण करून शेतकरी वर्गाला मदत द्यावी. तसेच एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. याबाबत नोटिफिकेशन निघालेले दिसत नाही. जी आश्वासने देण्यात आली, त्याची अद्याप पूर्तता करण्यात आलेली नाही. तसेच राज्यात महिला वर्ग असुरक्षित आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना होताना दिसत नाही. केवळ इव्हेंट करण्यावर भर दिला जात असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.
राष्ट्रवादीच्या विभाजनाचा फायदा आपण घेऊ
दरम्यान, नाना पटोले बैठकीत म्हणाले की, ” राष्ट्रवादीच्या विभाजनाचा आपण फायदा घेऊ, तसेच पुण्यातील जास्तीच्या जागा आपण पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करू. पुण्यामध्ये काँग्रेसची ताकद आहे, परंतु आता कार्यकर्त्यांनी काम करणे गरजेचे आहे. वेळेवर ब्लॉकच्या मीटिंग व्हायला हव्यात. उमेदवार कोण आहे यापेक्षा काँग्रेस संघटनेला महत्त्व द्या. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतभेद न ठेवता एक दिलाने काम केल्यास यश आपलेच आहे”. असा सल्ला नाना पटोले यांनी दिली आहे.
मराठा क्रांती मोर्चाची घोषणाबाजी; नाना पटोलेंना घेराव
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहे तर दुसरीकडे राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या जाहीर कार्यक्रम किंवा बैठकांच्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका काय? याबाबत जाब विचारतांना दिसत आहे.आज देखील मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका काय याबाबत मराठा आंदोलकांनी काँग्रेस भवन येथे आंदोलन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली.
याबाबत नाना पटोले पटोले म्हणाले की राज्यात आज जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला महायुती विशेष करून भाजप जबाबदार आहे.राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आम्ही याबाबतचं तोडगा काढणार आहोत.मागील दहा वर्षाच्या कालावधीत भाजपने समाजातील प्रत्येक घटकासाठी जो शब्द दिला तो पाळला नसून केवळ समाजात तेढ निर्माण करण्याच काम त्यांनी केलं आहे.तसेच हे सरकार आरक्षण विरोधी आहे आणि आमचे नेते राहुल गांधी यांनी तर आरक्षणाच्या बाबत आपली भूमिका मांडलेली आहे.