पुणे(प्रतिनिधि)–” महाराष्ट्रात मराठा, धनगर आदी समजाचा आरक्षणाच्या महत्वाच्या मुद्दयाकडे केंद्राने बघ्याची भूमिका न घेता प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राला कायद्यात बदल करावा लागेल असे सांगतानाच दोन्ही समाजाचे एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यामध्ये सामाजिक ताण-तणाव निर्माण होऊ नये, याची जबाबदारी सगळ्यांची आहे. आम्ही यामध्ये राजकारण आणू इच्छित नाही. पण येथे केंद्राला बघ्याची भूमिका घेवून चालणार नाही,” असा सल्ला वजा टोला जेष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला.
बारामती लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी बारामती, इंदापूर आदी ठिकाणी दौरा पूर्ण केला. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पवार बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी युगेंद्र पवार त्यांच्या समवेत उपस्थित होते. व्यक्तिगत हल्ले आणि अपघात वाढले आहेत. राज्य सरकारचे याबाबत दुर्लक्ष होत असल्याने जीवितहानी होत आहे. त्यावर पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार
दरम्यान, मराठा व धनगर आरक्षणाबाबतचा निर्माण होणारा सामाजिक तणाव कमी होणे, पुणे जिल्ह्यातील जानाई-शिरसाई योजना, पुरंदर उपसा आणि या योजनांच्या वीज बिलाच्या प्रश्न आणि खर्चाच्या तुलनेत दुधाचे दर शेतकऱ्यांना मिळवा, यासाठी मी मुख्यमंत्र्यांची पत्राद्वारे वेळ मागितली आहे. याबाबत उद्या (शुक्रवारी) संबंधित आधिकाऱ्यांशी बोलणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मी आग्रही त्यांनी सांगितले. ही लोकहिताची कामे उरकून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. विधानसभेत जेथे जेथे आम्ही जागा लढविणार आहोत, त्याठिकाणी जावून लोकांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर उमेदवारीबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.
पाण्याबरोबर दुधाचा धंदा महत्वाचा आहे, असे सांगून पवार म्हणाले, “दुधाची किंमत ही खर्चाच्या तुलनेत असावी. शासनाचे पाच लिटर दुधाला अनुदान मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्याबाबतही मुख्यमंत्र्याच्या बैठकीत तोडगा काढण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.”
मोदी हे मोदी आहेत ते कोणाचे ऐकतील असे वाटत नाही
इंडिया आघाडीचा विरोधी पक्षनेता कोण असणार, असे विचारले असता पवार म्हणाले,” पार्लमेंटचे कामकाज २६, २७ जूनला सुरू होत आहे. त्यावेळी बसून विरोधी पक्ष नेता निवडीबाबत चर्चा करणार आहे. काँग्रेसच्या लोकसभेत सर्वाधिक जागा आल्याने त्यांना विरोधी नेतेपद मिळेल, त्यांच्या निर्णयाला आमची सहमती असेल.
लोकसभा अध्यक्षपद रुलिंग पार्टीला जाते, उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला येईल का, या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, “मोदी साहेबांनी मागच्यावेळी हा संकेत पाळला नव्हता. त्यामुळे याबाबत चर्चा होईल, परंतु त्यामधून काही यश येईल असे मला वाटत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत जनेतेने त्यांना जागेवर आणले असले, तरी मोदी हे मोदी आहेत ते कोणाचे ऐकतील असे वाटत नाही.”
आम्ही महाराष्ट्र जिंकण्यासाठी काळजीने पावले टाकणार
महाराष्ट्रात भाजपचा पराभव आरएसएसने गार्भियाने घेतला आहे. परंतु, सामान्य जनता महाविकास आघाडीकडे झुकली आहे. यावर पवार म्हणाले,” भाजप आणि मोदी सरकार यांच्या विश्वासाला जनतेमध्ये तडा बसला आहे. मोदीसाहेबची गॅरंटी राहिली नाही. लोकसभेच्या ४८ जागा होत्या, त्यापैकी आमच्या तीन पक्षाने ३०, ३१ जागा जिंकल्या. विधान सभेच्या मतदार संघांचा विचार केला, तर १५५ मतदार संघामध्ये आम्हा लोकांचा विजय झाला. २८८ जागेची विधान सभा त्यातील १५५ मतदार संघात विरोधकांना बहुमत मिळते. याचा अर्थ जनतेचा कल हा महायुतीकडे आहे. त्या दुष्टीने आम्ही महाराष्ट्र जिंकण्यासाठी काळजीने पावले टाकणार आहे.” छगन भुजबळ आपल्याकडे परतण्याचे संकेत दिसतात का, यावर पवार यांनी नकारार्थी भूमिका मांडली व माझी त्यांची अलिकडच्या काळात भेट नसल्याचे सांगितले.