पुणे : एसओएसव्ही (SOSV) या व्हेंचर कॅपिटल (साहसवित्त) संस्थेच्या पुढाकाराने गुंतवणूकदारांकडून १४ लाख अमेरिकन डॉलर चा निधी मिळाल्याची घोषणा पुण्यात मुख्य कार्यालय असलेली सायजेनिका ने केली आहे. निधी मिळविण्याच्या या पहिल्या फेरीत मिळालेली रक्कम सायजेनिकाच्या पेशींमधील औषध वितरणाच्या सुरक्षित आणि कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाला मान्यता मिळविण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल असा दावा करण्यात आला आहे.
साय जेनिकाचे हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान जिवंत पेशींना इजा न करता किंवा त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण न करता त्यांच्यावर उपचार करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. आत्ताचा हा १४ लाख डॉलर चा बीज निधी एसओएसव्ही या व्हेंचर कॅपिटल संस्थेच्या पुढाकाराने उभारण्यात आला आहे. व्हॉयेजर हेल्थ-टेक फंड, व्हॉएजर्स.आयओ चे संस्थापक डेव्हिड रोवन आणि एंजल गुंतवणूकदार शराफ यामानी आणि सामी मिकाती हे इतर गुंतवणूकदार या निधीत सहभागी आहेत.
या निधीचा वापर करून साय जेनिका जेनोम एडिटिंग साठी औषध वापरण्याचे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रक्रियेला गती देईल. या तंत्रज्ञानाच्या बळावर साय जेनिका जैव औषध निर्मिती कंपन्यांची कर्करोग आणि दुर्मिळ व्याधींवर उपचार करण्यासाठीची औषधें विकसित करण्याच्या आणि रुग्णाचे जगणे सुसह्य करण्याच्या प्रक्रियेतील भागीदार होऊ शकेल.
या निधी विषयी साय जेनिका च्या सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नुसरत संघमित्रा म्हणाल्या, पेशींना इजा न करता किंवा त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण न करता कर्करोगावरील किंवा इतर जनुकीय औषधोपचार करण्यासाठी औषध निर्माण करणे हे औषधनिर्मिती उद्योगापुढील एक मोठे आव्हान आहे. आमचे हे पूर्णपणे नवे तंत्रज्ञान म्हणजे कोणत्याही संगणकावर वापरता येणा-या यूएसबी ड्राइव्ह सारखे आहे. ते एखाद्या नॅनो मशीन प्रमाणे वापरून औषध अपेक्षित ठिकाणी नेमकेपणे आणि इतर कशालाही धक्का न लावता पोचवता येते. यामुळे औषधोपचारांच्या प्रक्रियेत क्रांती घडेल आणि रुग्णाच्या प्रतिसादात मोठा फरक पडेल.
एसओएसव्ही चे भागीदार बिल लिआओ म्हणाले, या गुंतवणुकीचे नेतृत्व करताना मला अत्यंत समाधान होत आहे, कारण साय जेनिका ने जैवतंत्रज्ञानाच्या वाटचालीतील एक अत्यंत गंभीर अडचण दूर केली आहे. या क्रांतीतील हिस्सा असल्याचा आम्हाला आनंद आहे.
व्हॉयेजर्स डॉट आयओ चे संस्थापक डेव्हिड रोवन म्हणाले, जीवन पालटून टाकेल असे तंत्रज्ञान आरोग्याच्या क्षेत्रात विकसित करणे ही आता बड्या आयुर्विज्ञान संस्थांची मक्तेदारी राहिलेली नाही. व्हॉयेजर्स हेल्थ टेक फंड साय जेनिका ला अर्थसाह्य करताना समाधानी आहे. ओदिसा मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने कर्करोगाने ग्रस्त व्यक्तींवर सर्वसाधारणपणे आढळणारे साइड इफेक्ट न होता नेमकेपणाने औषधोपचार करण्याची प्रक्रिया आमूलाग्र बदलून टाकेलं असे तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता दाखवली आहे. डॉ नुसरत संघमित्रा यांना त्यांच्या प्रयत्नात हारत-हेने साह्य करण्याची व्हॉयेजर ची तयारी आहे.
आयुर्विज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करून नवीन संशोधनाला अर्थपुरवठा करणा-या सामी मिकाती यांनी सांगितले, डॉ. नुसरत यांनी उपचार पद्धतीतील एक महत्वाची समस्या सोडविण्याचा प्रयत्न हाती घेतला आहे. त्यांची भूमिका पूर्णपणे नवी आहे आणि विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील त्यांच्या ज्ञानाचे प्रतिबिंब त्यात दिसते.