Sunetra Pawar : महाराष्ट्र राजकारणात एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाची घडामोडी घडत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि दुःखद निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आता राज्याच्या उच्च कार्यकारी नेतृत्वात अधिकृत प्रवेश करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास संमती दर्शवली असून हा शपथविधी सोहळा उद्या, शनिवारी ३१ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता पार पडणार आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरून त्या आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठीही त्यांच्याकडेच ठेवण्यावर एकमत झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीला आपली संमती दिली असून शनिवारीच हा सोहळा पार पडण्यास त्यांची काहीही हरकत नाही..
उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी पक्षाच्या विधीमंडळाच्या आमदारांची बैठक होणार असून त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. सुनेत्रा पवार या त्यांच्या सहयोग निवास स्थानावरून मुंबईला त्यांची दोन मुळे पार्थ आणि जय पवार यांच्या समवेत रवाना झाल्या आहेत.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा या दोन महत्त्वाच्या मंत्रालयांची धुरा सोपवण्यात येणार असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. तथापि, राज्याच्या वित्त मंत्रालयाबाबत असा निर्णय घेण्यात आला आहे की, आगामी मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे हे खाते सध्या तात्पुरते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील आणि अधिवेशनानंतर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवले जाईल.
या राजकीय बदलाची पार्श्वभूमी अत्यंत दुःखद असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी बुधवारी २८ जानेवारी रोजी सकाळी एका भीषण विमान अपघातात निधन झाले. पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचे चार्टर्ड विमान धावपट्टीजवळ कोसळले, ज्यामध्ये अजित पवारांसह त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक, एक विमान कर्मचारी आणि दोन वैमानिक अशा एकूण पाचही जणांचा मृत्यू झाला.
येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला योग्य दिशा देण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी बढती देण्याचा प्रस्ताव मांडला होता.















