पुणे : कोरोनामुळे वाढलेली बेरोजगारी, कौटुंबिक ताणतणाव, आर्थिक चणचण, कर्जबाजारीपणा, सोशल साईट्सचा अतिवापर आणि त्यातून जडलेले मानसिक आजार यामुळे अनेकजण आत्महत्येच्या विचारांपर्यंत येत आहेत. त्यांना वेळीच योग्य समुपदेशन करून आत्महत्येच्या या बिकट वाटेवरून बाजूला नेण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’ने पुढाकार घेतला आहे. ‘स्टे कनेक्ट’ अशी साद घालत तणावग्रस्त लोकांना आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त केले जात आहे. ‘डिस्ट्रेस हेल्पलाईन’ पूर्णतः विनामूल्य आहे.
आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने अर्णवाझ दमानिया यांनी पुण्यात २००५ साली सुरु केलेल्या ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून विविध हेल्पलाईन चालवल्या जातात. या संस्थेतील समुपदेशक दूरध्वनी संवादाच्या माध्यमातून तणावग्रस्तांचे मन हलके करतात. ‘डिस्ट्रेस हेल्पलाईन प्रोग्रॅम’, ‘सुसाईड सर्वाइव्हर सपोर्ट सिस्टीम’, ‘पीअर एज्युकेटर्स प्रोग्रॅम’ आणि ‘अवेअरनेस प्रोग्रॅम’ अशा चार उपक्रमांतून हा संवाद होतो. पुण्यापासून सुरु झालेले हे काम दिल्ली, हरियाणा, औरंगाबाद, नागपूर, हिंगणघाट, पनवेल आदी भागांमध्ये पसरले आहे. ‘कनेक्टिंग ट्रस्ट’चे सीईओ लियान सातारावाला यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे. पुणे पोलीस, ससून जनरल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने ‘सुसाईड सर्वाइव्हर सपोर्ट प्रोग्राम’ राबविला जात आहे.
‘डिस्ट्रेस हेल्पलाईन प्रोग्रॅम’द्वारे तणावग्रस्त, व्यथित, निराश तसेच आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या व्यक्ती आपली व्यथा फोनवरून सांगतात. संस्थेतील स्वयंसेवक अशा लोकांचे म्हणणे ऐकून घेतात. त्यांना कोणत्याही प्रकारचा सल्ला दिला जात नाही. तसेच संबंधित व्यक्तीची माहिती गुप्त राहते. प्रत्येक कॉल अंदाजे ४५ मिनिटे चालतो. यातून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. भावनिक वेदना मोकळी होण्यासाठी प्रयत्न केला जातो. [email protected] या ईमेलवरूनही लोकांना संवाद साधता येतो. लॉकडाऊन कालावधीत दरमहा व्यथा मांडणाऱ्या ईमेलची संख्या १५ ते ४५, तर कॉलची संख्या १६० च्या आसपास अशी आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे. घरी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सहकारी शिक्षक प्रोग्रॅम राबविला जातो, असे एक स्वयंसेवक नमूद करतात.