पुणे(प्रतिनिधि)— ”एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल कोणीतरी अतिशय वाईट बोलतो. मात्र आम्ही अशा गोष्टींशी सहमत नाही. आमचा अशा गोष्टींना विरोध आहे. मतभेद असू शकतात, मात्र एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही“, असा इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी आळंदी येथे पक्षाच्या मेळाव्यात बोलताना दिला.
महायुतीतील भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य काही नेते विविध घटनांवर बोलत असताना मुस्लीम समाजावर आक्रमक भाष्य करत असतात. असं असतानाच आता अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. ”जाती-धर्माविरुद्ध बोलून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल“, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली आहे. लोकसभेला भाजपशी युती केल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटापासून मुस्लिम मतदार दुरावल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मुस्लिम समाजाला पुन्हा जवळ करण्यासाठी अजित पवार प्रयत्न करताना दिसत आहेत.
अजित पवार म्हणाले, कुणीतरी एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या धर्माबद्दल अतिशय वाईट बोलतो, त्या गोष्टीशी आम्ही अजिबात सहमत नाही. अशा गोष्टींना आमचा विरोध आहे. मतमतांतर असू शकतं. पण कुठल्या तरी जातीला आणि धर्माविरोधात बोलता आणि समाजाविरोधात तेढ निर्माण करता. हे शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात अजितबात खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्याविरोधात जी काही कायदेशीर कारवाई केली जाणं शक्य असेल ती केली जाईल असा इशारा अजित पवार यांनी दिला.
भावनेच्या भरात निर्णय घेतला की पश्चाताप होतो
भावनेच्या भरात घेतलेला निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळं मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो, भावनिक होऊन कोणता निर्णय घेऊ नका असं आवाहन अजित पवारांनी केलं. अजित पवार म्हणाले की, काही दिवस आम्हाला द्या, चुकलो तर आमचा कान पकडून जाब विचारा. तुमचा तो अधिकार आहे. मात्र भावनिक होऊन काही वेगळा निर्णय घेऊ नका. तुमचा आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या.
राहुल गांधींवर अजित पवारांची टीका
आरक्षण मला काढायचं आहे, असं राहुल गांधी परदेशात जाऊन बोलले. म्हणजे यांनी बोलायचं अन् पावती आमच्या नावावर फाडायची असं म्हणत अजित पवारांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. लोकसभेला जे झालं ते गंगेला मिळालं, पण आता विधानसभेला आम्हाला आशीर्वाद द्या असं आवाहनही त्यांनी केलं.
दिलीप मोहितेंना मंत्री करणार
महायुतीच्या जागा वाटपात खेड-आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा एकदा दिलीप मोहिते पाटलांना निवडून द्या. ग्रामपंचायत ते आमदारपर्यंत गाडी पोहचली आहे. आता लाल दिव्यापर्यंत गाडी पोहचवण्यासाठी साथ द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
आळंदीतील गैरप्रकारांवर पोलिसांनी आळा घाला
आपण आळंदीत नतमस्तक झाल्याशिवाय पुढं जात नाही. मागे आलो तेव्हा दोन तास दर्शन रांग थांबवावी लागली, लोक म्हणतील हा कोण लागून गेला, जे याला डायरेक्ट दर्शन दिलं जातं. म्हणून मी आज बाहेरून दर्शन घेतलं. पण आळंदीत घडणारे प्रकार ही चिंताजनक आहे. देवांच्या आळंदीत चुकीचे धंदे चालतायेत, वेडे-वाकडे प्रकार होतात. आता मी पोलिसांना हवं ते देतोय, मात्र त्यांचं काम नाही का? दोन नंबरचे धंदे बंद करण्याची जबाबदारी कोणाची आहे? इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, योग्य तो बंदोबस्त लावावा. कायदा सर्वांना समान आहे. आम्ही कोणताही राजकीय हस्तक्षेप केला नाही अन् करणारही नाही. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं असे ते म्हणाले.