पुणे-राज्यात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले आहे. बेडच्या कमतरतेबरोबरच सर्वात जास्त समस्या ही ऑक्सिजनची निर्माण झाली आहे. राज्यातील ऑक्सिजन उत्पादनाची पूर्ण क्षमता केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरली जात आहे. तर बाहेरूनही ऑक्सिजन मागविण्यात येत आहे. मात्र, तरीही ऑक्सिजनचा तुटवडा आहेच. दुसरी लाट, वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता ऑक्सिजनची आणखी गरज भासणार आहे. यावर मार्ग काढण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला असून वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचच्या वतीने राज्यातील १९० साखर कारखान्यांना ऑक्सिजनची निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसे पत्र या कारखान्यांना संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी पाठवले आहे.
काय म्हटले आहे पत्रात?
सद्य परिस्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी असे निर्देशित केले आहे की ज्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप चालू आहे व तसेच ज्यांचे सहविजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपलेला आहे अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. तसेच कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत व त्यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल.
ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करावयाचे झाल्यास त्यासाठी वाफ व वीजेची गरज भासते. साखर कारखान्यांमध्ये वाफ आणि वीज ही कारखाना चालू असताना उपलब्ध होऊ शकते. म्हणून कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारणी हाती घ्यावेत व त्याकरिता कारखान्यांना उपलब्ध साधनसामुग्री व मनुष्यबळ याचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चसुध्दा कमी होईल.
सध्याची कोविडची परिस्थिती ही भयावह असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य शासन व केंद्र शासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेतच, तथापि आपल्या सर्व साखर कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन उपलब्ध साधनसामुग्री, मनुष्यबळ व गरज भासल्यास आवश्यक ते भांडवल घालून ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. कारखान्यांना आसवणी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुध्द करण्याचा आणि कार्बनडायऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव आहे. याठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारण्याचे आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्वींग अॅडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन यापुढे त्वरीत कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती आहे. या अनुषंगाने सर्व कारखाने आपल्या कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करतील याची खात्री आहे, असे या पत्रात म्हटले आहे.