हिंदुत्वाचे आत्मभान हेच विकसित भारताचे सूत्र : शेफाली वैद्य

हिंदुत्वाचे आत्मभान हेच विकसित भारताचे सूत्र
हिंदुत्वाचे आत्मभान हेच विकसित भारताचे सूत्र

पुणे – देश टिकला तरच संस्कृती टिकेल, हे सत्य आपण लक्षात ठेवायला हवे. अनेक देशांमध्ये आपल्याप्रमाणेच संस्कृती विकसित झाल्या होत्या. मात्र कालौघात त्या नष्ट झाल्या. पेरु देशात असलेली समृद्ध इंका सभ्यता स्पेनच्या आक्रमणानंतर केवळ ५२ वर्षात नष्ट झाली, मात्र दुसरीकडे भारतात गोव्यामध्ये ४५० वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतरदेखील गोवा आजही हिंदु बहुलच आहे. आपल्या संस्कृतीवर असे अनेक आघात होऊनही ती टिकून राहिली आहे, हे आपले वैशिष्ट्य आहे”, असे मत सुविख्यात लेखिका शेफाली वैद्य यांनी व्यक्त केले.

सिंहगड रस्ता, पुणे येथील नांदेड‌ सिटी भागात श्री स्वामी समर्थ महाराज आणि महाअवतार बाबाजी मठाच्या वतीने, नवरात्रीनिमित्त एका विशेष प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास परिसरातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने शेफाली वैद्य यांचा सन्मान श्री. नरसिंहजी लगड व कुटुंबिय यांनी केला तर नांदेड सिटीतील मराठवाडा मित्र मंडळ , लिंगायत समाज व निळकंठेश्वर देवस्थानच्या वतीने देखील शेफाली वैद्य यांचा सन्मान या वेळी केला गेला.

समाजमाध्यमांतून हिंदुत्वाचा विचार प्रभावीपणे आणि निर्भयपणे मांडणा-या शेफालीताई या ख-या अर्थाने दुर्गास्वरूप आहेत, हे त्यांच्या परिचयात विशेषत्वाने सांगितले गेले. ज्येष्ठ गायक श्री. प्रमोद रानडे यांनी गायिलेल्या देशभक्तिपर गीतानंतर श्रीमती शेफाली वैद्य यांनी ‘विकसित भारत – अंतर्गत आव्हाने’ या सूत्रावर आपल्या विषयाची मांडणी केली.

अधिक वाचा  पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर - मुरलीधर मोहोळ : फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे विशेष ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’ 

त्या पुढे म्हणाल्या की, “स्त्रियांना उपजत सौंदर्य दृष्टि असते आणि त्यामुळेच अगदी लहानात लहान घरांमध्येदेखील तुळस, रांगोळीसारख्या गोष्टींमधून ही सुंदरता दृष्टीला पडते” असे सांगत त्यांनी विषयप्रवेश केला.

“हिंदुत्वामध्ये सुद्धा हीच सौंदर्यदृष्टी असून संस्कृतीचा हा गंगाप्रवाह युगायुगांपासून चिरंतन वाहत आहे. मात्र “जगभरात इस्लामच्या झंझावातापुढे अनेक देश अल्पावधीत इस्लाममय झाले असले तरी भारतात मात्र इस्लामला कडवा प्रतिकार झाला. फक्त संघटना आणि शत्रुबोधाचा अभाव असल्याने आपण पराधीन झालो, हे वास्तव आपण लक्षात घ्यायला हवे. आजही प्रामुख्याने हीच दोन आव्हाने विकसित भारतापुढे आहेत”, असे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.

विकसित भारताची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काही उदाहरणे सांगितली. २०१४ पूर्वी घरकाम करणा-या मावशींचे जे बँक खाते कागदपत्रे नसल्यामुळे उघडता येत नव्हते, तेच २०१४ नंतर मात्र जनधन योजनेत सहजपणे उघडले गेले आणि पुढे या मावशींचे आयुष्यच बदलून गेले, असा स्वतः अनुभवलेला प्रसंग त्यांनी कथन केला.

अधिक वाचा  नाटकांतून इतिहासाचा विपर्यास किंवा खलप्रवृत्तीचे उदात्तीकरण कदापि होता कामा नये- शरद पवार

तसेच उज्ज्वला गॅस आणि नळ योजनेमुळे पाणी भरणे, सरपण आणणे यात महिलांचा जाणारा मोठा वेळ  वाचला आणि या वेळात नवी कौशल्ये महिला शिकू लागल्या, असेही निरीक्षण त्यांनी ससंदर्भ मांडले.

मध्य प्रदेशातील एका खेड्यातील अनुभव सांगताना तेथील महिलेने उत्साहाने घरासोबत टॉयलेटही दाखवल्याचे शेफालीताई यांनी सांगितले. सामान्य लोकांच्या आयुष्यात हा खूपच मोठा बदल असून असा अंत्योदय म्हणजेच खरा विकसित भारत आहे, असे त्या म्हणाल्या.

 

“वर्ष २०१४ नंतर गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र ही मंत्रालये विशेष लक्ष देऊन सांभाळली गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे अंतर्गत सुरक्षा, सशक्त अर्थव्यवस्था, बाह्य शत्रुंना धाक आणि जगात उंचावलेली भारताची प्रतिमा ही फलिते आपल्याला मिळाली. हा केवळ कणखर नेतृत्वाचा प्रभाव आहे”, हे त्यांनी विशद केले.

आजच्या आव्हानांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “रोजगार निर्मितीचे आव्हान नक्कीच आहे आणि त्याकरिता तरुणांमध्ये उद्योजकता वृत्ती वाढण्याची गरज आहे. मात्र अराष्ट्रीय शक्तींच्या कारवायांचे  आव्हान त्यापेक्षाही गंभीर आहे. आज इथे सहज होणारी सभा पुण्यातीलच अन्य काही संवेदनशील ठिकाणी घेता येणार नाही, अशी आजची स्थिति आहे. लोकसंख्या गुणोत्तर बदलते आहे आणि परिस्थिति भयानक होत आहे, हे वास्तव समजून घेतले पाहिजे.” काश्मीरमध्ये नव्वदच्या दशकात झालेल्या हिंदूंच्या शिरकाणाचा उल्लेख करीत त्यांनी तिथल्या प्रत्यक्षदर्शींचे थरारक अनुभव सांगितले आणि मागील वर्षीच इस्राइल मध्ये झालेले भयंकर आक्रमण इथेही होऊ शकते, हे आपण लक्षात घ्यायला हवे, असेही त्या या प्रसंगी म्हणाल्या.

अधिक वाचा  फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं?

आपल्या व्याख्यानाचा समारोप करताना, ‘आपल्याला आपला भारत सुरक्षित ठेवायचा असेल तर समाज फोडण्याची षडयंत्रे समजून घेतली पाहिजेत आणि आपण हिंदू आहोत, हे आत्मभान सदैव बाळगले पाहिजे’ असा स्पष्ट संदेश शेफाली वैद्य यांनी उपस्थितांना दिला.

या वेळी गुरुश्री मठाधिपती श्री स्वामी समर्थ महाराज, मठाचे संचालक श्री. नरसिंहजी लगड, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुधीर काळकर, स्त्री शक्ति च्या श्रीमती अर्चना कौलगुड आणि अन्य अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीमती विद्याताई सर्जे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि श्री. सुधीर काळकर यांनी आभार प्रदर्शन केले. सामूहिक पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love