पुणे(प्रतिनिधि)–शहरातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा खळबळजनक मेसेज करून प्रशासनाला धास्तावून सोडणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, हा आरोपी स्वतः ससून रुग्णालयातच सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.
आरोपीचे नाव अरविंद कृष्णा कोकणी (वय २९, रा. येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो ससून रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी ससून रुग्णालयातील एका डॉक्टरच्या मोबाईल फोनवर एका अज्ञात क्रमांकावरून रुग्णालयात बॉम्ब असल्याची माहिती देणारा मेसेज आला. या घटनेने तातडीने रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवले. बंडगार्डन पोलीस आणि बीडीडीएस बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) तात्काळ रुग्णालयाच्या परिसराची कसून तपासणी केली. मात्र, या तपासणीत काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. या अफवामुळे रुग्णालय परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मेसेज रुग्णालयाच्या परिसरातूनच पाठवला गेल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी तांत्रिक तपासासह गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्रे वेगात फिरवली. अखेर, १४ मे रोजी पोलिसांनी अरविंद कृष्णा कोकणी या आरोपीला येरवडा परिसरातून अटक केली.
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपी अरविंद कृष्णा कोकणी याने गुन्ह्याची कबुली दिली. तो ससून रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याने हा प्रकार ज्या मोबाईल फोनवरून केला, तो मोबाईल रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७३ मधील एका महिला रुग्णाचा चोरलेला होता. या चोरीच्या मोबाईलवरूनच त्याने १२ मे रोजी डॉक्टरला आणि दुसऱ्या दिवशी (१३ मे रोजी) ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांना देखील धमकीचे मेसेज पाठवले होते. मेसेज पाठवल्यानंतर त्याने मोबाईल बंद (स्विच ऑफ) केला होता.
आरोपीने अशा प्रकारे बॉम्बची अफवा का पसरवली, तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय अधीक्षकांना धमकीचे मेसेज का पाठवले, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.