पुणे(प्रतिनिधि)–वैष्णवी हगवणे यांच्या दुर्दैवी निधनाने पुणे शहर शोकात बुडाले असताना, आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कस्पटे कुटुंबियांची (वैष्णवीचे माहेर) भेट घेतली. दरम्यान, त्यांना संतप्त महिला आणि छावा संघटनेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. वैष्णवीच्या मृत्यूस प्रशासकीय यंत्रणांचा दिरंगाईचा कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करत, महिलांनी चाकणकर यांना घेराव घालून तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
तुमच्या निष्क्रियतेमुळेच वैष्णवी गेली
महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना सांगितले की, “जर प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी वेळीच दखल घेतली असती, तर आज वैष्णवी जिवंत असती.” त्यांनी चाकणकर यांना त्यांच्या संवैधानिक पदाची आठवण करून देत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवण्याची विनंती केली. “तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्तींनी जर आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली नाही, तर अशा घटना वारंवार घडणार,” असे खडे बोल महिलांनी सुनावले. पीडित भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी महिलांनी यावेळी केली.
प्रशासनाच्या ढिलाईवर प्रश्नचिन्ह
यावेळी महिलांचा संताप अनावर झाला होता. महिला आयोगाच्या अध्यक्षांशी बोलण्यासाठी तब्बल १५ मिनिटे दारात उभे राहावे लागल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाकडे तब्बल आठ महिने दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत, महिलांनी प्रशासनाच्या ढिलाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मयुरी प्रकरणाचा दाखला देत महिला म्हणाल्या की, दुसरी दुर्दैवी घटना घडली नसती, तर कदाचित महिला आयोगाला यावर बोलावेही लागले नसते. प्रशासनाकडून वेळेत कार्यवाही न झाल्यामुळेच हे सर्व घडले, असा थेट आरोप महिलांनी केला.