पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव धायरी भागात असलेल्या श्री ज्वेलर्सवर तीन दरोडेखोरांनी मंगळवारी संध्याकाळी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विष्णू दहीवाळ यांच्या मालकीचे हे दुकान असून दरोडोखोरांनी त्यांच्याकडील पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील २० ते २५ तोळे सोने लुटुन नेल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, दरोडेखोरांनी चोरीसाठी वापरलेले पिस्तुल हे खेळण्यातील असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पळून गेलेल्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
सिंहगड परिसरातील धायरी येथील मंगळवारी (ता.१५) दुपारी तीनच्या सुमारास सिंहगड परिसरातील धायरी येथील श्री ज्वेलर्सचे मालक विष्णू दहिवाल हे कामगारासह दुकानातच होते. या दरम्यान दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास एक तरुण ज्वेलर्समध्ये आला. आपल्याला सोन्याची चैन घ्यायची आहे. त्यामुळे सोन्याची चैन दाखवा, असं हा तरुण बोलू लागला. यावेळी दुकानातील कामगार त्याला सोनं दाखवत होता. या तरुणाच्या पाठोपाठ आणखी दोन मुलं दुकानात आली. इतर दोन तरुण दुकानात घुसल्यानंतर त्या तीनही जणांनी दमदाटी देण्यास सुरुवात केली. त्यांनी पिस्तूलाचा धाक दाखवत ज्वेलर्स मालकाला मारहाण केली. यावेळी आरोपी तरुणांनी जवळपास २० ते २५ तोळे सोने हिसकावून घेतले. आरोपींनी ज्वेलर्स मालकावर बंदूक भिरकावली. तसेच मारहाणही केली. या झटापटीत आरोपीच्या हातात असलेली पिस्तूल तुटली आणि तुटलेला भाग खाली पडला. यानंतर आरोपी तरुणांनी तिथून धूम ठोकली. तीनही तरुण हे एका दुचाकीने पळून गेले.धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेत वापरलेली बंदुक ही खेळण्यातली असल्याचे समोर येत आहे.