पुणे -शस्त्र पूजन व विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतात 17 ठिकाणी सघोष पथसंचलन रविवार , दि 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता उत्साहात संपन्न झाले.
राष्ट्र सेविका समिती या अखिल भारतीय महिला संघटनेचा विजया दशमी हा स्थापना दिन. यंदा 87 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत पश्चिम महाराष्ट्र प्रांतात एकाच दिवशी एकाच वेळी नासिक, नगर, बारामती, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, कराड यासह पुणे महानगरातील सिंहगड, कसबा, कोथरूड, येरवडा, पर्वती , विद्यापीठ या 6 भागात एकूण 17 ठिकाणी सघोष पथसंचलने उत्साह वर्धक वातावरणात संपन्न झालीत. या पथ संचलनात एकूण 2910 सेविका संपूर्ण गणवेशात सहभागी झाल्या तर एकूण उपस्थिती 3968 होती. 5 वर्षांची बाल सेविका ते 92 वर्षाच्या जेष्ठ सेविका अशा सर्व वयोगटातील सेविका उपस्थित होत्या.विदेशात स्थिरावलेल्या कामानिमित्त भारतात आलेल्या सेविका ही अभिमानाने संपूर्ण गणवेशात सहभागी झाल्या होत्या.
पिंपळगाव बसवंत, बार्शी, कोपरगाव इ. तालुक्याच्या गावी प्रथमच अशा प्रकारचे महिलांचे संचलन झाले. घोष गणात तरुणी बरोबर गृहिणीचा समावेश होता. एकूण 395 घोष वादकानी विविध रागाचे वादन केले. काही भागातील भगिनी संचलन मार्गावर 500 मी पुढे जाऊन स्वतः शंख वाजवून संचलन येत असल्याची सूचना देत होत्या.
शस्त्रपूजन , प्रार्थना झाल्यावर ध्वजाला औक्षवण करण्यात आले. त्यानंतर घोषाच्या निनादात संचलनास सुरवात झाली.
विविध जिल्ह्यात/ भागात आयोजित केलेल्या या पथ संचलनाचे नागरिकांनी ही उत्स्फूर्त पणे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळीचे पायघडे, स्वागत तोरणे, कमानी उभारण्यात आल्या होत्या. मातृशक्तीचे विराट प्रकट दर्शन झाल्याने नागरिकांनी ही “जय श्रीराम” “भारत माता की जय” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमवून टाकले.