पुणे(प्रतिनिधी)-पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील फळ व्यापाऱ्यांनी तुर्कस्तान येथून आयात होणाऱ्या सफरचंदावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सदर व्यापाऱ्यांना थेट पाकिस्तान मधून धमकीचे फाेन आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फळ व्यापाऱ्यांना गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजता धमकीचे व्हॉटसअप कॉल आल्याने याबाबत व्यापाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तलयात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पाकिस्ताने भारतावर केलेल्या हल्लयात तुर्कस्तानचे ड्राेन आढळून आल्याने बॉयकॉट टर्किश प्रॉडक्ट मोहिम सुरु झाली आहे. पुण्यातील मार्केटयार्डमधील फळ व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानचे सफरचंदावर बंदी घातल्याने परदेशी व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचे वातावरण असून भारताला जगभरातून मोठया प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्याचप्रकारे पाकिस्तानला तुर्कीने पाठिंबा दिल्याने भारतीया मध्ये तुर्कीबद्दल चीड निर्माण झाली आहे. त्यामुळेच तुर्की सफरचंदावर देशात विविध ठिकाणी बहिष्कार घालण्यात येत आहे.
इराणमधून येणाऱ्या सफरचंदाचे दर त्यामुळे वाढलेले असून घाऊक बाजारात दहा किलो सफरचंदमागे २०० ते ३०० रुपये , तर किरकोळ बाजारात प्रति किलो २० ते ३० रुपयांची वाढ झालेली आहे. फळ व्यापाऱ्यांनी देखील तुर्की सफरचंद बदल्यात न्यूझीलँड, वॉशिंगटन व इराणच्या सफरचंदाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सदर सफसरचंदाचे भावात पेटीमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाल्याची माहिती मार्केटयार्ड मधील सफरचंद व्यापारी व गुरुदेव दत्त फ्रुट एजन्सीचे सत्यजीत झेंडे यांनी दिली आहे.
मार्केटयार्ड मध्ये मोठया प्रमाणात देश व परदेशातून सफरचंद आवक होत असते. तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यावर बॅन तुर्की हा ट्रेंड जोरात सुरु झाला आहे. तुर्कीतून येणाऱ्या सफरचंदावर बहिष्कार टाकला गेल्याने स्वस्तात सदर सफरचंद आवक होऊन देखील त्यांची खरेदीच व्यापाऱ्यांनी थांबवली आहे. इराणचा सफरचंद हंगाम अखेरच्या टप्प्यात तुर्की सफरचंद हंगाम सुरु होत असल्याने त्याची मोठी आवक होते. परंतु यंदा तुर्की सफरचंदावर सक्रांत आली आहे. दर महिन्याला साधारण एक हजार कोटीचे नुकसान तुर्कीचे यामाध्यमातून होऊ शकते. काश्मीर मधील सफरचंदवरील प्रक्रिया सध्या भारत -पाकिस्तान तणावामुळे ठप्प झाली आहे. तसेच नियंत्रित तापमान कक्षात ठेवण्यात आलेली काश्मीर मधील सफरचंदाच्या आवकवर देखील यंदाचे वर्षी परिणाम झाल्याचे दिसून येत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. जे देशाच्या विरो धात त्याच्याआम्ही विरोधात अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.