पुणे(प्रतिनिधी)– वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी आणि पोलीस व महिला आयोगाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ तसेच आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘आप’सह बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँगकडून शनिवारी आंदोलन करण्यात आले. चाकणकर यांनी विरोधकांना ‘चिल्लर’ संबोधल्याचा आरोप करत पुण्यातील गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे ‘थिल्लर पे चिल्लर फेको’ आंदोलन करण्यात आले.
आपचे प्रवक्ते मुकुंद कीर्दत, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पुणे शहर महिला अध्यक्ष सुरेखा भोसले, महिला आघाडीच्या पूजा वाघमारे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पक्षाच्या माधुरी गायकवाड, सुप्रिया बोबडे, उज्वला रोडगे, संगीता बागल, मुमताज शेख, उर्मिला वांजळे, अंजना वांजळे, सरुबाई वांजळे व अन्य महिला कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने आंदोलनात भाग घेतला. हुंडय़ाला राजकीय प्रतिष्ठा नको, हुंडा छळाविरोधात कठोर कारवाई करा, वैष्णवीला न्याय मिळवून द्या, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
सामाजिक प्रतिष्ठेपाई महिलांचा छळ होतो आणि त्यावर महिला आयोगही ईमेल पाठवण्यापेक्षा फारशी कृती करत नाही. भरोसा सेल, पोलीस यंत्रणा आणि शेवटी न्यायालय, अशा सर्वच व्यवस्थांमध्ये त्रुटी आहेत. महिलांना पोलीस यंत्रणेचा आधार वाटत नाही, अशी भावना श्रद्धा शेट्टी यांनी व्यक्त केली.
बिटीया फाऊंडेशन, गुलाबो गँगकडून चिल्लर टाकून आंदोलन
दरम्यान, बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात चाकणकर यांच्या फोटोवर चिल्लर टाकून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संगीता तिवारी, शोभा पणीकर, सुनिता नेमूर, रजिया शेख, प्रिया लोंढे, कांबळे ताई यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठा सांभाळण्यात अपयशी ठरलेल्या रूपाली चाकणकर यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. तसेच राजीनामा न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा इशाराही या वेळी देण्यात आला.