येत्या ७ व ८ एप्रिल दरम्यान कलारंग महोत्सवाचे आयोजन : अभिनेते सचिन खेडेकर यांचा निळू फुले सन्मानाने होणार गौरव

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे – बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आणि राजेश दामले यांच्या संकल्पनेतून येत्या शुक्रवार दि ७ एप्रिल आणि शनिवार दि. ८ एप्रिल, २०२३ रोजी कलारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. एरंडवणे येथील डी पी रस्त्यावरील केशवबाग या ठिकाणी सदर महोत्सव संपन्न होणार आहे. दोन्ही दिवशी सायं ६.३० वाजता महोत्सव सुरु होणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल.

महोत्सवात यंदा सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचा निळू फुले सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज झालेल्या पत्रकार परिषदेत बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर यांनी केली. निळू फुले यांचे जावई ओंकार थत्ते, राजेश दामले आणि नकुल बेलवलकर यावेळी उपस्थित होते.

महोत्सवाबद्दल अधिक माहिती देताना समीर बेलवलकर म्हणाले, “जाणकार पुणेकर रसिकांसाठी आम्ही नेहेमीच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असतो. या वर्षीपासून आम्ही कलारंग महोत्सवाला  सुरुवात करत आहोत. त्या अंतर्गत बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले यांची कन्या गार्गी फुले-थत्ते यांच्या संयुक्त विद्यमाने एका चतुरस्त्र अभिनेत्यास अथवा अभिनेत्रीस दरवर्षी निळू फुले सन्मान प्रदान केला जाणार आहे.” यावर्षी गेली चार दशके आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सचिन खेडेकर यांना तो प्रदान करण्यात येईल. रोख रुपये २१ हजार व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल, असेही त्यांनी नमूद केले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (शुक्रवार, दि. ७ एप्रिल) निळू फुले यांवरील विशेष दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मोठा नट; साधा माणूस’ असे या कार्यक्रमाचे नाव असून याद्वारे निळू फुले यांचा कलाप्रवास रसिकांसमोर उलगडला जाईल. याचे लेखन सतीश जकातदार यांनी केले असून सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले हा कार्यक्रम सादर करतील.

यानंतर गीतकार वैभव जोशी यांचा ‘ही अनोखी गाठ‘ हा विशेष कार्यक्रम होईल. यामध्ये वैभव जोशी हे त्यांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या कवी व गीतकारांचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडतील. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर करतील. यानंतर बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारे ‘ऐसी अक्षरे’ या विशेषांकाचे प्रकाशन वैभव जोशी यांच्या हस्ते होईल.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (शनिवार, ८ एप्रिल) ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते सचिन खेडेकर यांचा निळू फुले सन्मान प्रदान करीत गौरव करण्यात येईल. निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले थत्ते यावेळी उपस्थित असतील. यानंतर राजेश दामले हे सचिन खेडेकर यांची जाहीर मुलाखत घेतील.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *