पुणे – एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मुनोत यांना मुंबई महानगराचा विकास व वाढ यासाठी; तसेच भारताच्या आर्थिक राजधाऩीची सामाजिक वीण घट्ट करण्यामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मुंबई रत्न पुरस्कार २०२१ देऊन गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आलेले मुनोत हे म्युच्युअल फंड उद्योगातील पहिले लीडर आहेत.
टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा, गोदरेज समूहाचे अध्यक्ष अदि गोदरेज, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल, वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल आगरवाल, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी आदी ३१ नामवंतांचाही या प्रसंगी मुंबई रत्न पुरस्काराने सत्कार करण्यात आला.
मुंबई रत्न पुरस्कार हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडील उच्च शिक्षण विभागात नोंदणीकृत आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मुंबई रत्न पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराचे संयोजन फिल्म्स टुडे मीडिया ,नाना नानी फाउंडेशन आणि एनार ग्रुप यांच्यातर्फे करण्यात येते. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील राजभवन येथे आयोजित करण्यात आला होता.
सरकारी वकील उज्ज्वल निकम, डॉ. गौतम भन्साळी, मंजू लोढा, पार्श्वगायक उदित नारायण, भजन गायक अनुप जलोटा, युनियन बॅंकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजकिरण राय, डॉ. शोमा घोष, बीएसई चे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान यांचाही मुंबई रत्न पुरस्कार प्राप्त नामवंतांमध्ये समावेश होता.