जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला-  ‘मुलखावेगळी ती’:कष्टाळू वेदिका


बरोबरीची मित्र मैत्रिणी परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून तिकडेच स्थायिक होतात आणि त्या गृपमधली सगळ्यात हुशार मुलगी मात्र ‘India VS भारत’ या विचारात गढलेली होती. शालेय वयापासूनच माण – खटाव या ग्रामीण भागातून आलेली असूनही विविध स्पर्धा गाजवणारी वेदिका सुनंदा विठ्ठल सजगाणे ह्या मुलीची आज प्रशासकीय सेवेत class one officer  म्हणून निवड झाली आहे. कळायला लागल्यापासून चारचौघांपेक्षा नेहेमीच वेगळं ध्येय ठेवलेली वेदिका चाकोरीबद्ध शिक्षणात कधीच समाधानी नव्हती. त्यामुळेच मुंबई विद्यापीठातून Biomedical engineering करूनही ती यंत्रवत् कामात रमली नाही. तशीच, दिखाऊपणातही गढली नाही. ग्रामीण भागात अनुभवलेल्या अंधश्रद्धा, निरक्षरता हे सगळं वेदिकाला टोचत होतं, त्यातूनच सेवाभावी संस्थांशी ती बांधली गेली. वैयक्तिक विकासापेक्षा सामाजिक उन्नती तिला अधिक महत्त्वाची वाटली आणि त्यासाठी वेदिकाने स्पर्धा परीक्षेचा अवघड, वेळखाऊ मार्ग निवडला.

अधिक वाचा  #मुळखावेगळी ती : विशेष मुलांसाठी संवाद शाळा चालविणाऱ्या परमेश्वरीताई

बरोबरीची मंडळी नोकरी, घरसंसार, मुलंबाळं यांत रमलेली असताना वेदिका चिकाटीने अभ्यास, मुलाखतीचा सराव करत होती. अर्थात, याचं उत्तम फळ तिला मिळालं. पण ही आजवरची वाटचाल वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यातही अनेक परीक्षा बघणारी होती.  

वेदिकाच्या आईवडिलांना सुद्धा हा काळ सोपा नव्हता. मुलीच्या लग्नासाठी समाजातून येणारं दडपण मागे सारून मुलीच्या पाठी शिक्षणासाठी खंबीरपणे उभं राहण्याचं बळ त्यांनी आणलं. दुष्काळी ग्रामीण भागात हे वाटतं तेवढं सोपं नक्कीच नाही.

‌पण काळ आणि भगिरथ प्रयत्न सगळ्याला उत्तर देत असतात. एकेकाळी समाजाच्या खोचक प्रश्नांना चुकवण्यासाठी वेदिका सुट्टीच्या दिवशी, रात्री उशिरा गावी जायची, गेल्यावर सुद्धा बाहेर पडायची नाही; पण आज मात्र तिच्या गावात इतिहास घडलाय. उत्तम गुणांनी वेदिका स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाली, तिची Class one officer म्हणून निवड झाल्याची वार्ता तिच्या गावात पोहोचली आणि संपूर्ण गावाची मान अभिमानाने उंचावली. निकालानंतर माणला पोचलेली वेदिका कुणी वेगळीच होती, नव्हे, ज्या गावात राणी लक्ष्मीबाई जन्माला आली, तिचाच वारसा आता वेदिका चालवते आहे.

अधिक वाचा  जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला-  ‘मुलखावेगळी ती’: योगातून जागतिक कीर्ती मिळविणाऱ्या डॉ. पल्लवी कव्हाणे

 क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी तिला याच गावाचा देदीप्यमान वारसा सुपूर्द केला आहे. एकेकाळी लपतछपत घरी जाणार्‍या वेदिकाची गावाने घोड्यावरून मिरवणूक काढली, आईलडिलांसह सत्कार केला. परदेशस्थ मित्र मैत्रिणींनी आपापल्या मुलांना तिच्याबद्दल कौतुकाने सांगितलं आणि तिच्या आईचा अनेक ठिकाणी ‘आधुनिक जिजाऊ’ म्हणून सत्कार होत आहेत.

पण केवळ राजपत्रित अधिकारी होण्यात वेदिकाच्या प्रवासाचं सार्थक झालंय, असं मात्र नक्कीच नाही. उच्चशिक्षित आणि निरक्षरतेमुळे समाजात पडलेली दुही मोडून काढण्यासाठी वेदिका अधिकारी म्हणून कटिबद्ध आहे. तिची ही यशोगाथा स्पर्धा परीक्षांबद्दल अनेक प्रवादांमध्ये अडकलेल्या पुढच्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल. वेदिकाची नियुक्ती कुठे होणार, हे अजून कळलेलं नसलं, तरी ही महाराष्ट्रकन्या तिच्या गावाचं, राज्याचं आणि आम्हां महिलांचं नाव उंचावणारी कामगिरी करेल, याची खात्री आहे. वेदिकाला मनापासून शुभेच्छा.

अधिक वाचा  दुर्दम्य आशावादी - कर्मवीर भाऊराव पाटील

आसावरी देशपांडे जोशी

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love