पुणे(प्रतिनिधि)–तंबी दिल्यानंतरही आपल्या मुलीशी बोलत असल्याच्या रागातून मुलीच्या वडील व दोन भावांनी मिळून एका १७ वर्षीय तरुणाचालोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या लेकीसोबत बोलत असल्याचा रागातून बापाने आणि सख्ख्या भावांनी मिळून त्याचा निर्घृणपणे खून केला. गणेश धांडे असं हत्या झालेल्या १७ वर्षीय तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी आरोपी लक्ष्मण पेटकर (वय ६०), सुधीर पेटकर (३२ ) व नितीन पेटकर (३१, तिघे रा. वाघेश्वरनगर, गोरे वस्ती, वाघोली, पुणे) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मुलाचे वडील वाघु मारुती धांडे (वय ६४, रा. वाघोली, पुणे) यांनी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश धांडे हा दोन जानेवारी रात्री मध्यरात्री साडेबारा वाजता त्याच्या मित्रांसोबत घराजवळ दुचाकीवरुन येत होता. त्यावेळी आरोपींनी मुलीशी बोलत असल्याचा राग मनात धरुन त्यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर लोखंडी रॉड व दगड त्याच्या डोक्यात घातला. त्यात गणेशचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी पसार झाले. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. तसेच आरोपींनादेखील अटक केली. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत.
वाघोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड म्हणाले, मयत मुलाचे वडील हे मजुरी काम करत होते व त्यांना मुलगादेखील सहाय्य करत होता. ते राहत असलेल्या ठिकाणाजवळच आरोपी यांचे कुटुंब राहत आहे. कुठल्यातरी अज्ञात कारणास्तव मनात राग धरून आरोपींनी गणेश यास शिवीगाळ करीत लाथाबुक्क्मयांनी मारहाण केली तसेच लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करत संगनमताने त्यास ठार मारल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.