पुणे(प्रतिनिधि)—आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला महायुती म्हणून लढाईच्या आहे. आम्ही तिघेही एकत्र आहोत. आमच्या तिघांची ही महायुती आहे. मात्र काही अपवादात्मक ठिकाणे वगळता इतर सर्व ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता सकारात्मक प्रचार करून आम्ही निवडणुका लढवू. मात्र, जास्तीत जास्त ठिकाणी आणि महायुती करूनच निवडणुका लढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. असं असलं तरी आगामी निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढल्या जाणार की सर्व पक्षाकडून स्वबळाचा नारा दिला जाणार याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमावस्था आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले, “महापालिकेच्या निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत. अपवादात्मक परिस्थितीत काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली जाईल. शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जिथे तुल्यबळ स्पर्धक असतील तिथे अपवादात्मक परिस्थितीत वेगळे लढावे लागले तरी एकमेकांवर टीका न करता आम्ही निवडणूक लढऊ. कार्यकर्ते अनेक वर्ष प्रभागात काम करतात, त्यांना संधी द्यायला हवी. निवडणूकपूर्व वेगळी लढत झाली तरी निवडणुकीनंतर निश्चितच युती होईल”, असेही त्यांनी यावेळी सांगितले. .
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या मुदतीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. ज्या भागात पावसाचा जोर असेल त्या भागात निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याची विनंती करू. ज्या भागात पावसाचा प्रभाव जास्त आहे, तिथे गरज भासल्यास १५ दिवसांची मुदतवाढ मागितली जाऊ शकते असंही यावेळी फडणवीस म्हणाले. याबाबत सरकार आणि निवडणूक आयोग योग्य तो समन्वय राखेल. पण वेळेत निवडणुका पूर्ण झाल्याच पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे.
तुर्कियेच्या मालावर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापारांना सलाम
पहलगामचा हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर चित्रपट सृष्टी आणि महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी पाकिस्तान, तुर्किये आणि अझरबैजानशी व्यापार करण्यावर बहिष्कार घातला आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांनी बहिष्काराचा निर्णय घेतला, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. राष्ट्र प्रथम ही आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे. पहलगाममध्ये आपल्या लोकांना अतिशय क्रूर पद्धतीने मारले गेले. अशी क्रूरता करणारा देश आणि त्याला साथ देणाऱ्या देशांनाही धडा शिकविण्याची गरज आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “लोकांनी जर स्वतःहून राष्ट्र प्रथम ही भावना नजरेसमोर ठेवून काही कृती केली असेल तर मी त्यांचे स्वागत करतो.” याबरोबरच तुर्कियेशी व्यापार तोडल्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकी मिळाली आहे, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता फडणवीस म्हणाले की, तुर्कियेच्या मालावर ज्यांनी बहिष्कार टाकला, त्या व्यापाऱ्यांचे अभिनंदन. पहलगामवरील हल्ला फक्त भारतावरच नाही तर तो मानवतेवर झालेला मोठा हल्ला होता. मानवतेच्या हल्लेखोरांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास प्राप्त आहेत. त्यांना काळजी करण्याची गरज नाही.
लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुंडाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकमधील मिरवणुकीत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकविण्यात आले होते. याबाबतचा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी याबाबत बोलणे झाले असून पडळकर यांनी पोलिसांना याबाबतची माहिती द्यावी, असे सांगितले आहे. या प्रकारावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुंडाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही. ज्यांनी फलक झळकवले त्यांच्यावर कारवाई होईलच.”
खंडपीठ स्थापित करण्याबाबत आमची पूर्ण तयारी
मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जलद गतीने सोडवण्यात यावी, यासाठी कोर्टाने खंडपीठ स्थापन करण्याच्या आदेश दिले आहेत.त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, खंडपीठ स्थापित करण्याबाबत आमची पूर्ण तयारी आहे. उच्च न्यायालयाकडून खंडपीठ स्थापित केल्यानंतर आम्ही सरकारची बाजू भक्कमपणे मांडू.