पुणे: शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई आणि पूर व्यवस्थापनाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेला दिले आहेत. मागील काही वर्षांत कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याच्या वाढत्या घटनांमुळे शहरात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे, पावसाळ्यापूर्वीची कामे वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. या बैठकीत आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले, “शहरातील ८७५ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची साफसफाई आणि पूर व्यवस्थापनाच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. नालेसफाईसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी वेळेत आणि दर्जेदार काम करणे आवश्यक आहे. जे ठेकेदार कामात हलगर्जीपणा करतील, त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. तसेच, दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल.”
मोहोळ यांनी शहरातील पूरप्रवण ठिकाणांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देशही महापालिका प्रशासनाला दिले आहेत. शहरात आधी ११७ पूरप्रवण ठिकाणे होती, मात्र २२ गावे समाविष्ट झाल्यानंतर ही संख्या २०१ वर पोहोचली आहे. यापैकी ११७ ठिकाणांवरील कामे पूर्ण झाली असून, उर्वरित ८४ ठिकाणांवरील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ज्या ३९ ठिकाणांवरील कामे यंदा पूर्ण होऊ शकणार नाहीत, तेथे तात्पुरत्या उपाययोजना करण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिले आहेत.
“२०१९ मध्ये आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे शहरात मोठी आपत्ती आली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे. शहरात मान्सूनपूर्व कामांचा वॉर्डनिहाय अहवाल तयार करून त्याचा एकत्रित आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, प्रत्येक ठिकाणी कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जे कर्मचारी नेमून दिलेली कामे करणार नाहीत, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल,” असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
शहरातील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून, पुणे शहरासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून मंजूर झालेला निधी तातडीने महापालिकेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मोहोळ यांनी दिले.
आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवली जाईल, असेही मोहोळ यांनी या वेळी सांगितले. “गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.