थायलंड मधील उद्योजिका व फुकेत नाइन रिअल इस्टेट कंपनीच्या चेअरमन पापासोर्न मीपा या निस्सीम गणेश भक्त असून गेल्या अनेक वर्षापासून त्या पुण्यात दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. दगडूशेठ गणपती मंदिराची प्रतिकृती थायलंडमध्ये साकारून त्यामध्ये दगडूशेठ गणपतीची स्थापना करावी, असा त्यांचा मानस होता, त्याप्रमाणे त्यांनी २० महिन्यांपूर्वी थायलंड मधील फुकेत शहरात रवई बीच समोर मंदिर उभारण्यास सुरुवात केली.
या मंदिराचे भूमिपूजन ‘दगडूशेठ’ ट्रस्टचे तत्कालीन उपाध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष सुनील रासने यांच्या हस्ते संपन्न झाले होते. साधारण दोन वर्षानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये मंदिराचे काम जवळ जवळ पूर्ण झाले. सन २०२४ मध्ये दगडूशेठ मूर्तीच्या प्रतिकृतीची पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत पुण्यात मिरवणूक काढण्यात आली होती. या मूर्ती बरोबर बनवण्यात आलेली शंकराची पिंड, देवी सिद्धी व बुद्धी, लक्ष व लाभ, शंकर-पार्वतीची फायबरची मूर्ती श्रींची आभूषणे, वस्त्र, अलंकार, आसन हे साहित्य कंटेनर ने सागरी मार्गे थायलंडला पाठवण्यात आले. तब्बल ३० दिवसांचा प्रवास करून कंटेनर थायलंडला पोहोचले. या सर्व मूर्ती व आभूषणे, अलंकार पुण्यामध्ये साकारण्यात आले, अशी माहिती गणेश भक्त चेतन लोढा यांनी दिली .
गणेश मूर्तीची पारंपारिक पद्धतीने पुणेरी ढोल ताशाच्या गजरात फुकेत शहरात रथ मिरवणूक काढण्यात आली, यावेळी फुकेत शहरातील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पुणे शहरातून खास ढोल ताशा पथक, फेटे बांधणारे कारागीर यांना निमंत्रित केले होते. या मंदिराचे उद्घाटन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, सिद्धिविनायक ग्रुपचे चेअरमन राजेशकुमार सांकला, सुवर्णयुग बँकेचे संचालक राहुल माणिकराव चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते झाले.
मंदिरासाठी दहा कोटींहून अधिक खर्च लागला असून या मंदिराचे नामकरण त्यांनी ‘लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय’ असे केले आहे. हे मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले असून दररोज येथे ५०० हून अधिक भाविक दर्शन घेतात. मंदिरामध्ये अभिषेक, गणेश याग यांसारखे धार्मिक कार्यक्रम नित्य सुरु लवकरच होतील.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची व मूर्तीची प्रतिकृती थायलंड मधील फुकेत शहरांमध्ये स्थापन झाली, यामुळे हिंदू धर्माची पताका सातासमुद्रपार अभिमानाने फडकत आहे. थायलंड मधील लोकांनी हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करीत दगडूशेठ गणपती मंदिराची हुबेहूब प्रतिकृती थायलंडमध्ये बनवली गेली, या गोष्टीचा सार्थ अभिमान व आनंद आहे.