पुणे(प्रतिनिधी)–सुरेल सनईवादन…बँड पथकाचे सुमधूर वादन… ढोल ताशांचा गजर अन् रांगोळय़ांचा पायघडय़ा अशा भारावलेल्या वातावरणात मानाच्या पाच गणपतींना मंगळवारी निरोप देण्यात आला. पाऊसाने विश्रांती घेतल्याने मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.
मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आरती करून सकाळी 10.30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, दीपक मानकर आदी उपस्थित होते.यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. चांदीच्या पालखीमध्ये कसबा गणपती विराजमान होता. सव्वा अकराच्या सुमारास कसबा गणपतीचे बेलबाग चौकात आगमन झाले. रमणबाग, रुद्रगर्जना, परशुराम ढोल-ताशा पथकांच्या वादनाने लक्ष्मी रस्ता दुमदुमला. या ढोलपथकांच्या वादनाने गणेशभक्तांनाही थिरकायला लावले. कामायनी पथकाने आपली कला सादर करत गणेशबक्तांची मने जिंकली. दुपारी साडेतीन वाजता टिळक चौकात आगमन झाले. त्यानंतर 4.18 मिनिटांनी गणपतीचे घाटावर विसर्जन झाले.
कसबा गणपती पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मार्गस्थ झाला. श्रीची विलोभनीय मुर्ती चांदीच्या पालखीत विराजमान झाली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांच्या नगारावादनानाने वातावरणात भक्तीरस निर्माण केला. यानंतर न्यू गंधर्व बँड पथकाने प्रथमच शिवतांडव वाजवून गणेशभक्तांची मने जिंकली. यानंतर समर्थ प्रतिष्ठान ने भगावधारी आयोध्यापती सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शिवमुद्रा या ढोल-ताशा पथकाने जय मल्हार हा जिवंत देखावा सादर करत खंडोबाचा जागर करण्यात आला. शिवमुद्रा ने आपल्या वादनाने गणेशभक्तांना भारावून टाकले. यानंतर विष्णूनाथ हे शंख वादनाचे पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. तसेच महिलांचे लेझीम पथकही लक्षवेधक ठरले. ताल ढोल ताशा पथकाच्या वतीने कारगिल युद्धाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इंडियन अर्मीला मानवंदना देण्यात आली. पारंपरिक पेहरावातील अश्वारूढ कार्यकर्ते मिरवणुकीमध्ये उपस्थित होते. सायंकाळी ४.२५ मिनिटांनी हा गणपती अलका चौकात आला. पावणेपाच वाजता या गणपतीचे विसर्जन झाले.
तांबडी जोगेश्वरी गणपती पाठोपाठ मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मार्गस्थ झाला. गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक सूर्य रथातून काढण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवर लिफ्टींग स्पर्धेत पदके मिळवून देणारे महिला पुरुष खेळाडूंचा समावेश होता. रवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांच्या नगारावादनाचा गाडा होता. नादब्रम्ह ढोल-ताशा वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. तसेच तृतीयपंथीयांच्या शिखंडी पथकाने लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीत गुलालाची मुक्तहस्त उधळण करण्यात आली. मंडळाचे कार्यकर्ते गुलालामध्ये न्हाऊन निघाले होते. सव्वापाचच्या सुमारास गणपती अलका चौकात दाखल झाला. पावणेसहा वाजता सुमारास या गणपतीचे विसर्जन झाले.
यापाठोपाठ जगन्नाथ रथतून मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती लक्ष्मी रस्त्यावर दाखल झाला. तो दाखल होताच त्याचे जल्लोषात स्वागत झाले. लोणकर बंधूंची सनई आणि बिडवे बंधूंच्या नगारा वादनाने गणेशभक्त भारावून गेले. शिवमुद्रा ने जगन्नाथ चा ठेका वाजवून गणेशभक्तांना भारावून टाकले. स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी या ढोल-ताशा पथकांच्या वादनाने आसमंत दुमदुमला. स्वरुपावरधिनीच्या ने केली मल्लाखमंबची प्रात्यक्षिके आकर्षक ठरली. पावणेसहा वाजता गणपती अलका चौकात दाखल झाला. सव्वसहा वाजता या गणपतीचे विसर्जन झाले.
यानंतर फुलांनी सजवलेल्या मेघडंबरी रथातून मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा मिरवणुकीत सहभागी झाला. बिडवे बंधू यांचे नगारावादन मिरवणुकीच्या मध्यभागी होतं. श्रीराम शिवमुद्रा, आवर्तन या ढोल-ताशा पथकांनी वाजवलेल्या तालावर गणेशभक्तांनीही ठेका धरला. पावणेसात वाजता गणपती अलका चौकात दाखल झाला. सव्वासात वाजता गणपतीचे विसर्जन झाले.
मानाच्या गणपतींसाठी रांगोळ्यांच्या पायघडय़ा : गणेशभक्तांचा महापूर
मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावरून जाणार असल्याने लाखो पुणेकरांचा टिळक चौकात जनसागर लोटला होता. सकाळी साडेदहा वाजता राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला मंडई येथून प्रारंभ झाला. प्रत्येक चौकात राष्ट्रीय कला अकादमीकडून मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तरुणाई नैराश्येच्या विळख्यात ही थीम त्यांनी घेतली होती. त्यातून जनाजगृतीपर् रांगोळ्या काढल्या होत्या. यामध्ये ३०० ते ३५० कलाकार सहभागी झाले होते.