आळंदी : संतपरंपरेच्या पावन भूमीत, श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे तीन दिवसीय हिमालयीन समर्पण ध्यान शिबिराच्या माध्यमातून हजारो भक्तांनी आत्मिक शांततेचा व आध्यात्मिक जागृतीचा अद्वितीय अनुभव घेतला. या शिबिराचे मार्गदर्शन हिमालयीन महर्षी, आध्यात्मिक सदगुरू व हिमालयीन समर्पण ध्यान संस्काराचे प्रणेते श्री शिवकृपानंद स्वामीजींनी केले.
स्वामीजींनी संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेल्या विश्वधर्म, आत्मधर्म आणि आत्मानुभूती या सूक्ष्म तत्त्वज्ञानाचा साक्षात अनुभव भक्तांना दिला. या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने देशभरातून आणि विदेशातून समर्पण ध्यानाचे साधक उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या रूपात खालील दिग्गजांनी आपली उपस्थिती नोंदवली.
याप्रसंगी सुप्रसिद्ध आयकर सल्लागार तथा चांगुलपणाची चळवळ अध्यक्ष राज देशमुख, आळंदी देवस्थान विश्वस्त राजेंद्र उमाप, नागपूरचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, शंकर महाराज मठाचे ट्रस्टी सतीश कोकाटे, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, श्री शिवकृपानन्द स्वामी फाऊंडेशनचे डायरेक्टर अंबरीश मोडक, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल नेवासा संस्थापक व अध्यक्ष श्री व सौ घाडगे पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मुख्य विश्वस्त हभप निरंजन नाथ महाराज (आळंदी), उद्योजक नितीन ढमाले, बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन हनुमंत गायकवाड, माजी आयुक्त मुंबई डी. के. साके, मुंबई मराठा फ्रूटवाला ट्रस्ट आळंदीचे अध्यक्ष रंजन शेठ जाधव आदी उपस्थित होते.
संजीवन समाधीच्या पावन सान्निध्यात ध्यानाच्या गूढ प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात शांततेचा दीप उजळला. या दिव्य कार्याबद्दल श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची, पुणे यांच्या वतीने स्वामीजींना विशेष सन्मानपत्र आणि ज्ञानेश्वर महाराज ची मूर्ती प्रदान करण्यात आले. संस्थेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, “स्वामीजींच्या ध्यानदीपाचा मंगल प्रकाश असेच असंख्य अंतःकरणे उजळवत राहो,” अशी भावनिक शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.