पुणे : स्प्रिंगर नेचर इंडिया रिसर्च टूर २०२४ ने आज पुण्यातील प्रतिष्ठेच्या अशा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत (‘बोरी’) येऊन करून एक मैलाचा दगड पार केला. संशोधनातील सचोटी आणि ओपन अॅक्सेस प्रकाशन या विषयांवरील संवादाला चालना देण्याच्या उद्देशाने हा दौरा सुरू आहे. यामध्ये भारतातील अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संस्थांशी त्यांच्या संशोधनाच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि चर्चा, व्याख्याने, साधने आणि संसाधनांद्वारे संशोधन समुदायांना समर्थन देण्यासाठी संवाद सुरू आहे.
सध्याच्या शैक्षणिक परिदृश्यात ओपन अॅक्सेस प्रकाशनाचे महत्त्व या विषयावर चर्चासत्राचे आयोजन ‘बोरी’मध्ये करण्यात आले होते. यात संशोधनात पारदर्शकता आणि नैतिक पद्धती सुनिश्चित करण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि धोरणे मांडण्यासाठी यावेळी अग्रगण्य विद्वान आणि उद्योगातील व्यावसायिक एकत्र आले होते. ‘बोरी’चे सचिव सुधीर वैशंपायन स्वागतपर भाषण केले तर समारोप ‘बोरी’च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी केले.
यावेळी बोलताना स्प्रिंगर नेचर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व्यंकटेश सर्वसिद्धी यांनी या दौऱ्याचे व्यापक ध्येय अधोरेखित केले. ते म्हणाले, “आमचा इंडिया रिसर्च टूर २०२४ हा भारतभरातील शैक्षणिक समुदायांशी संपर्क साधण्यासाठी आणि संशोधनात सचोटी आणि मोकळेपणाची आवश्यकता बळकट करण्यासाठी एक आवश्यक असा उपक्रम आहे. संशोधनातील सचोटी आणि ओपन अॅक्सेसबाबत संवाद ‘बोरी’सारख्या संस्थांमध्ये थेट घडवून आणून अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याची आणि सीमापार सहकार्यास प्रोत्साहन देण्याची आम्हाला आशा आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आम्ही भारतातील संशोधन समुदायाला मुक्त प्रवेश देऊन आणि संशोधन पद्धतींमध्ये सचोटीला प्रोत्साहन देऊन आधार देण्यास कटिबद्ध आहोत. ‘बोरी’मधील आजची चर्चा या आवश्यक विषयांना पुढे नेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे संशोधकांना त्यांचे निष्कर्ष व्यापकपणे आणि जबाबदारीने सामायिक करणे शक्य होणार आहे.”
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे नियामक परिषदेचे उपाध्यक्ष आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषदेचे कौन्सिल मेंबर प्रा. प्रदीप आपटे यांनी या चर्चेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, ”’बोरी’मध्ये आम्ही नेहमीच संशोधनाच्या कठोर मानकांना महत्त्व दिले आहे. संशोधनातील सचोटी आणि मुक्त प्रवेश याविषयावरील आजची चर्चा आमच्या ध्येयाशी पूर्णपणे सुसंगत आहे. ओपन अॅक्सेस प्रकाशनाकडे वळल्यामुळे ज्ञानाचे लोकशाहीकरण होईल, संशोधनाच्या निष्कर्षांपर्यंत व्यापक प्रवेश मिळेल आणि अधिक सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण निर्माण होईल. आजच्या संशोधनाच्या वातावरणात शैक्षणिक संस्था आणि प्रकाशक यांच्यातील सहकार्य महत्त्वाचे आहे. स्प्रिंगर नेचरसाठी यजमानाची भूमिका निभावणे आणि या महत्त्वपूर्ण चर्चांमध्ये सहभागी होणे हा आमचा सन्मान आहे. यामुळे भारतातील संशोधन प्रकाशनाचे भवितव्य घडण्यास मदत होईल.”
तत्पूर्वी स्प्रिंगर नेचर इंडिया रिसर्च टूर बस कंपनीच्या पुणे कार्यालयात थोड्या वेळासाठी थांबली. तिथे कर्मचाऱ्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. बसमध्ये प्रवास करणाऱ्या तज्ञांशी संवाद साधून या दौऱ्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता आला. त्यातून संशोधन आणि नाविन्यपूर्णतेची संस्कृती जोपासण्याची कंपनीची कटिबद्धता दृढ झाली. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समुदाय आणि सहकार्याची भावनाही वाढली. तसेच भारतातील संशोधन पद्धतींना उठाव देण्यासाठी स्प्रिंगर नेचरची कटिबद्धता अधोरेखित झाली.
स्प्रिंगर नेचर इंडिया रिसर्च टूर २०२४ देशभरातील महत्त्वाच्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना भेटी देऊन विज्ञान आणि शिक्षणाचे भवितव्य घडवणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद साधणार आहे. ओपन अॅक्सेसची संस्कृती निर्माण करणे आणि संशोधनातील सचोटीचे सर्वोच्च मापदंड अबाधित ठेवण्याच्या उद्दिष्टाने देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांशी ती संपर्क करणार आहे.