पुणे(प्रतिनिधि)–प्रेयसीने २८ वर्षीय प्रियकराची मित्रांच्या मदतीने हत्या करून अपघात झाल्याचा बनाव रचत प्रियकराला रुग्णालयात दाखल केलेल्या प्रेयसी रेखा भातनसे आणि तिच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.
बालाजी उर्फ बाळू मंचक पांडे असं खून झालेल्या तरुणाच नाव आहे.. पोलिसांनी याप्रकरणी प्रेयसी रेखा भातनसे आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे. रेखा आणि बालाजी नात्यात होते. ते पिंपरी-चिंचवड भागातील चिखली येथील घरकुल सोसायटीत राहायचे. मात्र, मागील काही दिवसांपासून बालाजी रेखाला त्रास द्यायचा, दारू पिऊन रेखाला मारहाण करायचा, तिचा मानसिक छळ करायचा.याच त्रासाला कंटाळून रेखाने बालाजीची हत्या करण्याचा कट रचला. त्यादिवशी रेखाने बालाजीला चिखलीतील आपल्या घरी बोलावलं. तिथे आधीच आदित्य शिंदे दिनेश उपादे आणि इतर आरोपी येऊन बसले होते. बालाजी येताच त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. बालाजीच्या पायावर आणि डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली.. बालाजी यात गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनीच गंभीर जखमी झालेल्या बालाजीला रिक्षातून महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेलं. मात्र, उपचारापूर्वीच बालाजीचा मृत्यू झाला होता.. आरोपींनी बालाजीला रुग्णालयात दाखल करताना अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यासाठी त्यांनी आपली नावही खोटी सांगितली आणि रुग्णालयातून पळ काढला होता.
मात्र रुग्णालयातील डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी पोलिसांना एका रिक्षातून बालाजीला रुग्णालयात आणल्याचं दिसून आलं. पोलिसांनी या रिक्षाचा माग काढला असता ही रिक्षा चिखलीतील दुर्वांकुर सोसायटीतील असल्याचा समोर आलं. पोलीस दुर्वांकुर सोसायटीत पोहोचले आणि तिथेच पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा मिळाला. लिफ्ट मधून जात असताना पोलिसांना रक्ताचे डाग आढळले. त्यांनी या डागाचा मागोवा काढला असता ते याच सोसायटीतील ३०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये पोहोचले. त्या ठिकाणी पोलिसांना एक सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी आढळली. आरोपी रेखा भातनसे हिची ही अल्पवयी मुलगी होती..
पोलिसांनी मयत बालाजीचा फोटो तिला दाखवला आणि ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिने सगळी कहाणीच पोलिसांना सांगितली. दारू पिऊन त्रास देणाऱ्या बालाजीला रेखा भातनसे आणि तिच्या मित्रांनी मारल्याचे सांगितलं.. त्यानंतर पोलिसांनी प्रेयसी रेखा हिला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच तिने खुनाची कबूली दिली. मारहाण करत मानसिक त्रास देत असल्यामुळे खून केल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी रेखा हिच्यासह तिच्या दोन मित्रांना अटक केली. तर रेखाच्या अल्पवयीन मुलीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खून प्रकरणात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आता पिंपरी चिंचवड पोलीस तपास करत आहेत..