सामाजिक जबाबदारीने गणेशोत्सव मंडळ कार्यरत राहतील : विनय कुमार चौबे :

सामाजिक जबाबदारीने गणेशोत्सव मंडळ कार्यरत राहतील
सामाजिक जबाबदारीने गणेशोत्सव मंडळ कार्यरत राहतील

पुणे : पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण देशभरातून हजारो लोक येतात. औद्योगिक शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख असल्याने कामानिमित्त येथे अनेक वर्षे वास्तव्य देखील करतात. येथील सण-संस्कृती पाहतात, आत्मसात करतात आणि आपापल्या शहरांमध्ये गेल्यावर तेथे त्याचा अवलंब करतात, ही आपल्या संस्कृतीची शान आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी सर्वांसमोर असाच आदर्श ठेवायला हवा. जेणेकरुन हा सामाजिक संदेश सर्वत्र पोहोचेल. याकरिता सामाजिक जबाबदारीने गणेशोत्सव मंडळांनी कार्यरत रहायला हवे, असे मत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२३ पिंपरी-चिंचवड विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. यावेळी आमदार अमित गोरखे, भाऊसाहेब भोईर, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, स्पर्धेचे समन्वयक बापूसाहेब ढमाले आदी उपस्थित होते.

विनय कुमार चौबे म्हणाले, पुण्याचा गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून इतर राज्यांत देखील चौका-चौकात साजरा होताना दिसत आहे. हे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये साज-या होणा-या उत्सवाचे आणि मंडळांचे यश आहे.

आमदार अमित गोरखे म्हणाले, गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून माझी सुरुवात झाली. मंडळाचे काम करताना प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आपण लहान कामांपासून मोठया कामांपर्यंत कामे करु शकतो. भविष्यात कोणत्याही क्षेत्रात कार्य करताना या अनुभवाचा फायदा होत असतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सुरु केलेल्या स्पर्धेमुळे गणेशोत्सवात सामाजिक विषय सादर होत आहेत. यामुळे उत्सवाचे सामाजिक रुप पहायला मिळत आहे.

प्रास्ताविकात हेमंत रासने म्हणाले, पिंपरी-चिंचवड परिसरात मागील ३२ वर्षांपासून ही स्पर्धा सुरु आहे. गणेशोत्सवाला विधायक व रचनात्मक वळण लागावे, हा यामागील उद्देश आहे. गणेशोत्सवात हजारो कार्यकर्ते तयार होऊन त्यांचा उपयोग समाज व देशाकरिता व्हायला हवा. जगाच्या नकाशावर हा उत्सव अधिकाधिक चांगला पद्धतीने न्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

महेश सूर्यवंशी म्हणाले, सातत्याने पहिल्या पाच क्रमांकात येणा-या जय बजरंग तरुण मंडळ पवळे उड्डाण ब्रीज निगडी, जय हिंद मित्र मंडळ  ट्रस्ट प्राधिकरण निगडी, लांडगे लिंबाची तालीम मंडळ भोसरी गावठाण, पठारे लांडगे तालीम मित्र मंडळ भोसरी, गांधी पेठ तालीम मित्र मंडळ भोसरी, एस.के.एफ मित्र मंडळ चिंचवड या मंडळांना जय गणेश भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यापुढे ही मंडळे प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होणार नाहीत, यामुळे नव्या मंडळांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळेल.

स्पर्धेत निगडी प्राधीकरण येथील शरयू नगर मित्र मंडळाने प्रथम, चिंचवडगाव येथील उत्कृष्ट तरुण मित्र मंडळाने द्वितीय, जुनी सांगवीतील सिझन ग्रुप सोशल वेल्फेअर ट्रस्टने तृतीय, भोसरीतील कै.दामू शेठ गव्हाणे मित्र मंडळाला चौथा क्रमांक आणि फुगेवाडीतील आझाद हिंद मित्र मंडळाला पाचवा क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेत १९८ मंडळे सहभागी झाली होती. त्यातील १०३ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १२ लाख ८८ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  पुस्तकांमधून वैचारिक जडणघडण होते : देवेंद्र फडणवीस