पुणे : आगीतून स्वतःची सुटका कशी करावी… आग आटोक्यात आणण्यासाठी वाळू, माती, पाणी आणि ओल्या कपड्यांचा वापर कसा करावा.. प्रथमोपचार कसे द्यावे…आग लागल्यावर घाबरुन जाऊ नका अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांना माहिती द्या असे सांगत, अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण आणि त्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नऱ्हे येथील शैक्षणिक संकुलात अग्निशमन दलाची प्रात्यक्षिके झाली. यावेळी स्थानक अधिकारी प्रकाश जग्गनाथ गोरे, फायर इंजिन चालक गणेश ससाणे, मुख्य फायरमन संजय सकपाळ, फायरमन गणपत पडये, आकाश शिंदे, सुरज माने , ऋषिकेश गीते, आकाश किवळे, इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते.
ऍड. शार्दुल जाधवर म्हणाले, आगीच्या घटनांबाबत विद्यार्थी, शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी अग्निशामक दलाच्या वतीने प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. अग्निशामक विभागातर्फे ‘अग्निसुरक्षा उपाययोजना : प्रशिक्षण व प्रात्यक्षिके’ हा उपक्रम घेण्यात आला.
अग्निशमन दलाच्या या प्रात्यक्षिकांमध्ये अग्निशमन उपकरणांच्या वापराबाबत आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये स्वतःला आणि इतरांना कसे वाचवायचे, आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित करण्याचे मार्ग, काय करावे, करू नये, प्रथमोपचार कसे द्यावेत ही माहिती देण्यात आली.