मराठवाडा मित्रमंडळाच्या इन्क्युबेशन सेंटरमधील स्टार्टअपला वीस कोटींचे आर्थिक पाठबळ : भाऊसाहेब जाधव यांची माहिती

Financial support of 20 crores to start-ups in incubation center of Marathwada Mitra Mandal
Financial support of 20 crores to start-ups in incubation center of Marathwada Mitra Mandal

पुणे : “मराठवाडा मित्रमंडळ संचालित फाउंडेशन फॉर मेकइटहॅपन सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशनने (एफएमसीआयआयआय) इन्क्युबेट केलेल्या स्टार्टअपला स्मार्ट मीटरच्या उत्पादनासाठी ‘फिल्टरम एलएलपी’ या संस्थेकडून वीस कोटींची भागीदारी केली आहे,” अशी माहिती मराठवाडा मित्रमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

कर्वेनगर येथील मराठवाडा मित्रमंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील ‘एफएमसीआयआयआय’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेवेळी संस्थेचे सचिव किशोर मुंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय गोहोकर, ‘एफएमसीआयआयआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर तलाठी, स्मार्ट मीटर स्टार्टअपचे व्यंकटेश शेटे आदी उपस्थित होते.

भाऊसाहेब जाधव म्हणाले, “मराठवाडा मित्रमंडळाने संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञानातील उत्कृष्टता, कौशल्य व उद्योजकता विकास, मूल्याधारित शिक्षणावर भर देत ‘येथे बहुतांचे हित’ हा विचार जपला आहे. विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, इन्व्हेंशन, स्टार्टअप संस्कृती व उद्योजकतेची भावना रुजावी, या उद्देशाने ‘एफएमसीआयआयआय’ची स्थापना करण्यात आली. आजवर अनेक स्टार्टअपचे यशस्वीरीत्या उद्योगांमध्ये रूपांतर झाले आहे. स्मार्ट मीटरच्या या स्टार्टअपला तब्बल वीस कोटींची गुंतवणूक मिळणे आमच्याकरिता अभिमानाची गोष्ट आहे.”

डॉ. चंद्रशेखर तलाठी म्हणाले, “अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात ‘एफएमसीआयआयआय’ची टाटा टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने, शाश्वत, विस्तारक्षम व परिवर्तनशील उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने २०१८ मध्ये स्थापना झाली. सर्व पायाभूत सुविधांनी सज्ज हे केंद्र स्टार्टअपच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरत आहे. विविध प्रयोगशाळा, सुसज्ज कार्यालय, संगणक कक्ष, मिटिंग व बोर्ड रूम, थ्रीडी प्रिंटर व स्कॅनर, रोबोट, वर्किंग मॉडेल्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्टार्टअप प्रदर्शन, उद्योग भेटी, प्रशिक्षण व तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजिले जातात.”

अधिक वाचा  पुण्याच्या पुराला साबरमती प्रकल्पाचे अनुकरण जबाबदार : मुठा नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती देण्याची आदित्य ठाकरेंची मागणी

“कल्पना, विकास आराखडा, अर्थसहाय्य व उत्पादन अशा चार टप्प्यांमध्ये स्टार्टअपचे यश आहे. सॅट-स्मार्ट प्रीपेड एनर्जी मीटर, पेट्स अँड मी, सायटस हेल्थकेअर-इलेक्ट्रॉनिक विटनेस सिस्टीम विथ एआय, व्हीज गिजमो-होम ऍटोमेशन, वाट बघतोय रिक्षावाला ऍप, इलेपोर्ट-ईव्ही फॉर ट्रान्सपोर्ट यासह अन्य काही स्टार्टअप यशस्वी झाले आहेत. जवळपास दीड कोटींचा निधी या स्टार्टअपसाठी दिला गेला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज, संशोधन व विकास, माहिती तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, पुनर्विकास, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा, कृषी आदी क्षेत्रातील ६५ स्टार्टअप येथे सुरु आहेत. ड्रीम्स रिडेव्हलप्ड आणि शेटे ऍडवान्सड टेक्नॉलॉजी (स्मार्ट मीटर) या दोन स्टार्टअपना २१.५ कोटींचा निधी भागीदारी स्वरूपात मिळाला आहे,” असे डॉ. चंद्रशेखर तलाठी यांनी नमूद केले.

व्यंकटेश शेटे म्हणाले, “स्मार्ट प्रीपेड एनर्जी मीटरच्या निर्मितीत ‘एफएमसीआयआयआय’चे योगदान मोलाचे आहे. सुरुवातीला १० लाखांचा निधी सीड फंड म्हणून मिळाला. तसेच भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र व १५०० कोटींचे लेटर ऑफ इंटेन्ट मिळाले आहे. फिल्टरम एलएलपीकडून मिळालेली वीस कोटींची गुंतवणूक जोमाने काम करण्यास प्रेरक आहे. देशभरात बसविण्यात येणाऱ्या २८ कोटी मीटरपैकी जवळपास सहा कोटी स्मार्ट मीटर बसविण्याचे ध्येय आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. चाकण येथे स्मार्ट मीटरचे उत्पादन सुरु होणार असून, महाराष्ट्रासह बिहार, मिझोराम, झारखंड आदी राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु होईल. या मीटरमुळे वीजचोरी रोखली जाईल. तसेच आवश्यक तितका वापर व वापर तितका खर्च येईल.”

अधिक वाचा  राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन होईल व मनसेही महायुतीत सहभागी होईल : दीपक केसरकर

“स्टार्टअप संस्कृती, उद्योजकतेला चालना देण्यासाठी मराठवाडा मित्रमंडळाचे हे पाऊल कौतुकास्पद आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे नियमितपणे सहकार्य असून, स्मार्ट मीटरसाठी वीस कोटींची भागीदारी मिळणे आनंदाची गोष्ट आहे. यामुळे इतर स्टार्टअप व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळेल.”

– डॉ. राजेंद्र जगदाळे, महासंचालक, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क

———————————-

“महाविद्यालयाच्या आवारात इनोव्हेशन व इन्क्युबेशन सेंटर असल्याने विद्यार्थ्यांना स्टार्टअपविषयीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे. तसेच त्यांना इंटर्नशिपची संधी मिळत आहे. अनेकांनी त्यातून प्रेरणा घेत स्टार्टअप सुरु केले आहेत. विद्यार्थ्यांतील संशोधन वृत्ती, स्टार्टअप संस्कृती व उद्योजकता विकसित होण्यासाठी हे केंद्र एक महत्वाचे व्यासपीठ ठरले आहे.”

– डॉ. विजय गोहोकर, प्राचार्य, मराठवाडा मित्रमंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय

 

एफएमसीआयआयआय’ची ठळक वैशिष्ट्ये:

– टाटा टेक्नॉलॉजीज आणि सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे सहकार्य

– ३० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेले १२ हजार स्क्वेअर फुटाचे केंद्र

– विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण व मार्गदर्शन

– एकाचवेळी ५० स्टार्टअप्सना विकसित करण्याची क्षमता

– नाविन्यपूर्ण कल्पना, सेवा देण्यासाठी, स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी सक्षम पाठिंबा

– तांत्रिक, जैव, आर्थिक, कृषी व औषधनिर्माण आदी स्टार्टअपना प्रोत्साहन

– पेटंट, कॉपीराईट, डिझाईन रजिस्ट्रेशन आणि व्यावसायिकरण यासाठी साहाय्य

– सीड फंड, अँजेल इन्व्हेस्टमेंट, व्हेंचर कॅपिटल, प्रायव्हेट इक्विटी उपलब्ध करण्यात पुढाकार

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love