पुणे- पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्याप जाहीर प्रचाराला सुरुवात झालेली नाही. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याच प्रचारात सुसूत्रता दिसून येत आहे. दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांची महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरीने डोकेदुखी वाढल्याचे दिसते आहे. त्याचा परिणाम त्यांच्या प्रचारावर होताना दिसतो आहे. मोरे यांना तीन दिवसांपूर्वी वंचित कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांची हळूहळू प्रचाराला सुरुवात झाली आहे.
मोहोळांना मिळतोय विविध घटक आणि समाजांचा पाठिंबा
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ नियोजनबद्ध प्रचारात आघाडी घेतली आहे. मोहोळ हे दररोज समाजातील विविध घटकांची तसेच विविध समाजाच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यातून त्यांचा सूक्ष्म पातळीवर प्रचार सुरू आहे. मोहोळ यांनी सांस्कृतिक,क्रीडा,महिलावर्ग,कामगार अशा विविध घटकांबरोबर प्रत्यक्ष भेटून त्यांच्या क्षेत्रातील अडीअडचणी समजून घेत आहेत. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रत्येक क्षेत्रासाठी केलेलं काम आणि भविष्यात काय करता येईल याबाबत चर्चा ते या घटकांबरोबर करताना दिसत आहे. त्यांनी अगदी पोस्टमन, पुणे वृत्तपत्र विक्रेता सारख्या दुर्लक्षित घटकांचीही भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे या घटकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे.
दुसरीकडे मोहोळ हे दररोज वेगवेगळ्या समाजाच्या गाठीभेटी घेत आहेत. पाली जिल्हा जाट समाज, सिरवी क्षत्रिय समाज, श्री गोडवाड सिरवी क्षत्रिय समाज, बंट्स संघ, राजस्थानी समाज, स्वकुळ साळी समाज, बोहोरी समाज, सहस्त्र अर्जुन क्षत्रिय समाजाच्या त्यांनी गाठीभेटी घेत संपर्क केला आहे.
पुणे लोकसभेची भाजपा- महायुतीची उमेदवारी मोहोळ यांना मिळाल्याबद्दल त्यांचे या विविध समाजांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणावर या सर्वांनी विश्वास दर्शवत पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास या समाजांकडून व्यक्त केला जात आहे.
दिवसेंदिवस समाजातील विविध घटक आणि विविध समाजांकडून मोहोळ यांना मिळणारा पाठिंबा यामुळे मोहोळांचे पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे.