पुणे(प्रतिनिधि)–पुणे शहरातील गणेश मंडळांनी गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद (ड्राय डे) ठेवण्यात यावी अशी मागणी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काही गणेश मंडळांनी ही मागणी केली आहे.
गणेशोत्सवासाठी काही दिवस शिल्लक राहिले असून घरोघरी बाप्पांच्या स्वागतासाठी भक्ताची तसेच सार्वजनिक मंडळांची तयारी सुरु आहे. त्याचबरोबर पोलीस व जिल्हा प्रशासनाकडूनही तयारी केली जात आहे. पुणे शहरातील गणेश मंडळांनी गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद (ड्राय डे) ठेवण्यात यावी अशी मागणी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शहरातील ३०० मंडळांचे ६०० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत त्यांच्या सूचना मांडल्या असून काही मंडळांनी दहा दिवस ड्रायडे ठेवल्याने कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहील असं मत व्यक्त केलं.
यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल आणि डीजेसंदर्भात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या बाबत प्रत्येक मंडळांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली जाईल. गणेश उत्सव उत्साहात मात्र नियमात साजरा व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असेल. विसर्जन मिरवणुकीत एका मंडळाच्या समोर किती ढोल पथके असणार याचा निर्णय पुढच्या बैठकीत घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या वर्षी ज्या गणेश मंडळांनी परवानगी घेतली आहे त्यांना ५ वर्ष परवानगी घेण्याची गरज नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली. तसेच नवीन मंडळांसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात येणार आहे. अनेक गणेश मंडळे हे वर्गणी न घेता उत्सव मंडळात स्टॉलला परवानगी देताना, या वेळी वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. तसेच कमानी उभारताना देखील वाहतुकीचा विचार करून नियमात बसेल अशा पद्धतीने उभाराव्यात. या संदर्भात स्थानिक पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या वेळेसंदर्भात प्रत्येक झोननुसार बैठका घेतल्या जाणार आहेत.