मद्यधुंद डंपर चालकाने पदपाथवर झोपलेल्या मजूर कुटुंबातील नऊ जणांना चिरडले : तीनजण ठार; सहा जखमी

मद्यधुंद डंपर चालकाने पदपाथवर झोपलेल्या मजूर कुटुंबातील नऊ जणांना चिरडले
मद्यधुंद डंपर चालकाने पदपाथवर झोपलेल्या मजूर कुटुंबातील नऊ जणांना चिरडले

पुणे(प्रतिनिधी)- पदपथावर झोपलेल्या मजुरांच्या कुटुंबातील नऊ जणांना भरधाव डंपरने चिरडले. या भीषण घटनेत दोन चिमुरड्यांसह एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वाघोली येथील केसनंद फाटा चौकात सोमवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास घडली. तर, सहा जखमींवर ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. पदपथावर १२ जण झोपले होते. त्यातील तिघे बालंबाल बचावले. यातील डंपर चालकास अटक करण्यात आली आहे. त्याने मद्यपान केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

विशाल विनोद पवार (२२), वैभवी रितेश पवार (१) आणि वैभव रितेश पवार (२ सर्व रा.अमरावती ) अशी मृतांची नावे आहेत. तर, जानकी दिनेश पवार (२१), रिनिशा विनोद पवार (१८), रोशन शशादू भोसले(९) , नागेश निवृत्ती पवार(२७) , दर्शन संजय वैराळ (१८), आलिशा विनोद पवार (४७) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी डंपरचालक गजानन शंकर तोटरे ( २६, सध्या रा. केसनंद ता.हवेली , मूळ रा. पाळा, ता. मुखेड, जि. नांदेड ) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरेंद्र भोसले (४५, मूळ रा. सारवाडी देववाडी, ता. कारंजा घाडगे जि. वर्धा ) यांनी फिर्याद दिली आहे.

अधिक वाचा  कोरोमंडल इंटरनॅशनलने एस. शंकरसुब्रमण्यन यांना एमडी आणि सीईओ म्हणून दिली पदोन्नती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे अमरावती जिल्ह्यातील असलेल्या २२ जणांचा ग्रुप कामाच्या शोधात रविवारीच येथे आला होता. ते सर्व केसनंद फाटा चौकात पदपथावर झोपले. यावेळी केसनंद-आव्हाळवाडी येथून डंपरचालक गजानन तोटरे हा खडी घेऊन केसनंद चौकातून पोलीस ठाण्यामागील रस्त्याने एका साइटवर गेला होता. तेथे खडी उतरवल्यावर तो पुन्हा केसनंदकडे चालला होता. चौकातून केसनंदकडे वळण घेताच तो थेट पदपथावर चढला. तेथे विशाल, वैभवी आणि वैभव यांच्या थेट अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा जणांना डंपरचे चाक घासून गेले. जखमींचा आक्रोश समजताच समोरच्या वाघोली पोलीस ठाण्यातील रात्रपाळी कर्मचारी आणि तेथेच पाल टाकून असलेल्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने जवळील खासगी रुग्णालयात जखमींना दाखल केले. यानंतर त्यांना सकाळी ससून रुग्णालयात हलवण्यात आले. घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश घोरपडे हे उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love