पुणे – कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार निलेश बन्सीलाल घायवळ (वय- 44) याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
निलेश घायवळ हा सराईत गुन्हेगार आहे. कोथरूड परिसरात त्याची दहशत आहे. आपल्या साथीदारांसोबत तो कोथरूड परिसरात दुखापत करणे, मारामारी करणे यासारखे गंभीर गुन्हे करीत आहे. कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातून त्याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
तरी हा गुन्हेगार पुणे शहर अथवा पुणे जिल्ह्यात कोठे आढळून आल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पुणे पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.













