शिवाजीनगर एसटी बस स्थानकाची उभारणी लवकरच सुरू होणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती

शिवाजीनगर एसटी बस स्थानकाची उभारणी लवकरच सुरू होणार
शिवाजीनगर एसटी बस स्थानकाची उभारणी लवकरच सुरू होणार

पुणे : शिवाजीनगर एसटी बसस्थानक उभारणीसाठी महामेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यातील करार अंतिम टप्प्यात आला असून येत्या तीन वर्षांत बस स्थानकासह तेथे भव्य संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कळविली आहे. यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून गेल्या वर्षी शिरोळे यांनी या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यानंतर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी अनेक बैठका घेत या समस्येतून त्यांनी मार्ग काढला.

या संदर्भातच शिरोळे यांनी नुकतीच महाराष्ट्र मेट्रो रेल कोऑपरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. महामेट्रोच्या जनसंपर्क आणि प्रशासन  विभागाचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे हे देखील यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  जबाबदार नेते इतके पोरकटपणे बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पाहिले - शरद पवार

याबद्दल अधिक माहिती देताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना  याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अडीच वर्षाच्या काळात त्या संदर्भात काहीही हालचाली झाल्या नाहीत. महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. एसटी महामंडळाने त्यांचा आराखडा महामेट्रोकडे दिला आहे.” आता पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून महामेट्रोने त्यांच्या कराराचा मसुदा बनविला आहे. येत्या पंधरवड्यात याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही शिरोळे यांनी सांगितले.

शिवाजीनगर एसटी बसस्थानक आणि संकुल असा हा प्रकल्प सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांचा असून मेट्रो रेल्वे आणि एसटी बस गाड्या एका ठिकाणी उपलब्ध झाल्याने पुणेकरांची मोठी सोय होईल असेही शिरोळे म्हणाले. सध्या शिवाजीनगर मेट्रोचे भुयारी स्थानक सुरू झाले आहे. येत्या वर्षभरात हिंजवडी ते न्यायालय हा मेट्रो मार्गही लवकर सुरु होणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love