पुणे(प्रतिनिधि)—इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहावीचा निकाल आज (मंगळवार दि.13 मे) सकाळी ११ एक वाजता जाहीर केला जाणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी १ वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
दरवर्षीपेक्षा सुमारे १० दिवस आधी परीक्षेचे नियोजन करण्यात आले.त्यामुळे निकालही लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत राज्य मंडळातर्फे देण्यात आले होते. येत्या १५ मे पूर्वी निकाल जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले होते.त्यानुसार दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राज्य मंडळातर्फे कळविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या. या परिक्षेला राज्यातील जवळपास १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८.६ लाख मुले, ७.४७ लाख मुली आणि १९ ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश होता. दहवीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार mahresult.nic.in वर त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स, म्हणजेच रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून ऑनलाइन निकाल तपासू शकतात.
विद्यार्थ्यांसाठी खालील संकेत स्थळांवर निकाल उपलब्ध असतील:
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
विद्यार्थी त्यांच्या विषयानुसार मिळालेले गुण या पाहू शकतात. तसेच, निकालाची प्रिंट आऊट देखील काढू शकतात. शाळांना त्यांचा एकत्रित निकाल “in school login” या वेबसाईटवर दिसेल. या वेबसाईटवर शाळांसाठी सांख्यिकीय माहिती (statistics) देखील उपलब्ध असेल.
विद्यार्थ्यांसाठी मंडळाने केलेल्या सूचना
१) ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकांची झेरॉक्स कॉपी हवी आहे, ते त्यासाठी अर्ज करू शकतात. तसेच, ज्यांना पेपर पुन्हा तपासायचा आहे, म्हणजेच पुनर्मूल्यांकन करायचे आहे, ते देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि ती मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. “ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.” गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मे २०२५ आहे. अर्ज भरताना Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking चा वापर करून शुल्क भरता येईल.
२) उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी एक अट आहे. “फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील.” म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांना पेपर पुन्हा तपासण्याची इच्छा आहे, त्यांना आधी उत्तरपत्रिकेची झेरॉक्स कॉपी घ्यावी लागेल. ती मिळाल्यानंतर ५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल. अधिक माहितीसाठी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
३) जे विद्यार्थी सर्व विषयात पास झाले आहेत, त्यांच्यासाठी गुण सुधारण्याची संधी आहे. “फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु.-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.” याचा अर्थ, जे विद्यार्थी आपले गुण वाढवू इच्छितात, ते पुढील तीन परीक्षांमध्ये (जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ आणि जून-जुलै २०२६) पुन्हा परीक्षा देऊ शकतात.
४) ज्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ मे २०२५ पासून सुरु होईल. “जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक १५/०५/२०२५ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत.” या परीक्षेसाठी कोण अर्ज करू शकतं, याबद्दलची माहिती लवकरच जाहीर केली जाईल.