पुणे- विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्त्यांवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कदाचित राज्यपालांना वयोमानानुसार लक्षात राहत नसल्याची बोचरी टीका केली होती. त्यावर राज्यपाल यांचं वय झालं आणि शरद पवार साहेब यांचं वय झालं नाही का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर पलटवार करताना केला होता. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांतदादा, तुमचं जेवढं वय आहे तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे, असा पलटवार राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडीओ ट्विट करून केला आहे.
वयोमानामुळे राज्यपालांना लक्षात राहत नसावं म्हणून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या असाव्यात असं शरद पवारांनी म्हटलं होतं. पवार बोलल्यानंतर चंद्रकांत पाटील राज्यपालांच्या मदतीला धावून गेले. पहिली गोष्ट राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरी गोष्टी चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे. हे कोथरूड व्हाया आमदार झालेल्या दादांनी लक्षात घ्यावं, असा टोला चाकणकर यांनी लगावला.
दादा, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात. चार दिवस दिल्लीत थांबूनही अमित शहा यांनी तुम्हाला भेट नाकारली. याचं जरा आत्मचिंतन करा. तेव्हाच कुणाच्या वयाचा काय मुद्दा आणि साहेबांवर काय बोलावं याचं तुम्हाला भान येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.