पुणे(प्रतिनिधी)– लष्कराचे शिस्तबद्ध संचलन, सुखाई लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती आणि भारतीय सैन्यदलाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘बॉम्बे सॅपर्स’ या लष्करी संस्थेच्या मैदानावर बुधवारी भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी परेडची पाहणी करत सैनिकांची मानवंदना स्वीकारली. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचा इशारा भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या वेळी बोलताना दिला.
बीईजी कमांडंट ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती, जीओसी दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा मेजर जनरल अनुराग बिजनोई, लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठी आदी या वेळी उपस्थित होते. देश स्वतंत्र होताच १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी ले. जन. के. एम. करिअप्पा यांची निवड झाली. तेव्हापासून १५ जानेवारी हा भारतीय लष्कराचा वर्धापदिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या विविध भागात याचे आयोजन होते. मागच्या वषी लखनौ शहरात ७६ वा आर्मी-डे साजरा झाला होता. यंदा ७७ वा वर्धापनदिन पुणे शहरात झाला. लष्कराचे बहारदार संचलन, अत्याधुनिक लष्करी वाहने, हेलिकॉप्टर, रोबोटीक श्वान यांच्यासह लष्कराच्या सुखोई लढाऊ विमानांनी या वेळी मानवंदना दिली.
नेपाळ आर्मी बँड प्रथमच आर्मी डे परेडमध्ये सहभागी
भारतीय आणि नेपाळी लष्कराच्या दीर्घकालीन मैत्रीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱया आर्मी डे परेड २०२५ मध्ये नेपाळी आर्मी बँडची तुकडी पहिल्यांदाच ऐतिहासिक स्वरूपात सहभागी झाली. तीन महिला सैनिकांसह ३३ सदस्यांचा समावेश असलेल्या या तुकडीमध्ये ब्रास आणि पाईप बँड दोन्ही सादर केले गेले. नेपाळी आर्मी बँडचा परेडमधील सहभाग शांतता, स्थिरता आणि परस्पर आदर यावर आधारित आहे. दोन देशातील वाढत्या लष्करी आणि राजनैतिक संबंधांचा तो पुरावा असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.
अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सेनेचे सक्षमीकरण-लष्करप्रमुख
सध्या देशाच्या उत्तर सीमेवर शांतता आहे. पण कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहे. पश्चिम सीमेवर कडक सुरक्षा तैनात असून, या भागातील हिंसाचार आणि घुसखोरी कमी झाली आहे. संवेदनशील ठिकाणी सैनिक पहारा देत आहेत. देशाला प्रगती साधण्यासाठी शांतता आणि स्थैर्य आवश्यक आहे. याबाबत सेनेची भूमिका महत्वपूर्ण आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सेना आगामी काळात अधिक सक्षम होईल, असा निर्धार भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. द्विवेदी म्हणाले, पुण्यात ७७ वा आर्मी परेड डे होत आहे, ही गर्वाची बाब आहे. भारतीय सेनेतील महिलांचा सहभाग हा सन्मानजनक आहे. त्यांना केवळ ठराविक जबाबदारी न देता सर्व गोष्टीत सामावून घेतले जात आहे. या वषी नेपाळ लष्कर यांचा बँड सहभागी झाला आहे, ही बाब दोन देशातील संबंध दृढ होण्याकरिता महत्त्वपूर्ण आहे.